सचिन जिरे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 15 जानेवारी : बिअर शॉपीमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून एका 27 वर्षीय तरुणाची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरातील सिटी चौक परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान सिकंदर खान या (27 वर्षीय) असं मृत तरुणाचे नाव आहे. धारधार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या हत्येप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या मधील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.
समीर आणि त्याचा मित्र आदिल हे दोघे जण शहरातील मध्यवर्ती भागातील पिया मार्केट येथील ओम साईलीला बिअर बारमधून पार्सल आणण्यासाठी गेला होता. पार्सल घेऊन येत असताना समोरील वडाच्या झाडाखाली तीन तरुणांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून समीर आणि तिन्ही तरुणांमध्ये मारामारी झाली. यात त्याचा मित्र आदिल सुद्धा मदतीला धावून आला होता. या धुमश्चक्रीत समीरवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. चाकू थेट मांडीत घुसला. या हल्ल्यात त्यांच्या गुप्तांगाजवळ खोलपर्यंत जखम झाली आणि तो जागेवर कोसळला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
हत्या झालेल्या समीरवर या पूर्वी विनयभंग, अपहरण, हाणामारी सारखे गुन्हे दाखल होते. समीर हा गांजा विक्री करत होता. तर ताब्यात घेण्यात आलेला जो आरोपी आहे त्यावर देखील यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. मृत आणि मारेकरी एकमेकांच्या ओळखीचे नसल्याने क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे चर्चेला उधाण आले आहे.
सीसीटीव्ही तपासणी दरम्यान हे तिघेही घटनस्थळाच्या काही अंतरावर दिसून आले होते. मृतासोबत असलेला त्याचा मित्र मोहम्मद आदिलने ओळखल्याने पोलिसांनी मध्यरात्री तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या किरकोळ कारणावरून झाली की मग या मागे दुसरे काही कारण आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.