चंदीगड, 06 मार्च: आसाराम बापू, राम रहिम, बाबा चिन्मयानंद अशा अनेक ढोंगी बाबांचा पर्दाफाश झाल्यानंतरही देशात अशा बाबांच्या काळ्या कर्तृत्वाचं सत्र थांबताना दिसत नाहीये. यामध्ये आणखी एका प्रकरणाचा समावेश झाला आहे. एका ढोंगी बाबाने (Fake Priest) 22 वर्षीय युवतीवर बलात्कार (Raped 22 year old young women) करून तिची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आरोपीने बाबाने पीडित युवतीचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून गावातील एका शेतीत टाकून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित भोंदू बाबाला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीचं नाव संबोध दास असं असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील आसा रसीदपूर येथील रहिवासी आहे. एडीसीपी समीर वर्मा यांनी सांगितलं की, आरोपी संबोध दास सध्या पंजाबमधील लुधियानातील दुगरी फेज 3 च्या एलआयजी फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच फुलांवाल एन्क्लेव्हच्या काली माता मंदिराजवळ तो आश्रमही चालवत होता.
बलात्कार केल्यानंतर ज्या 22 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली, ती मुलगी 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. याप्रकरणी मृत युवतीच्या पित्याने 28 फेब्रुवारी रोजी तिच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मृत युवती एका ऑटोमोबाईल कंपनीत मॅनेजर होती. पण लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी ती नोकरीच्या शोधात फिरोज गांधी मार्केट याठिकाणी गेली होती. परंतु घरी परतलीच नाही.
(हे वाचा- जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला बलात्कार प्रकरणातील आरोपी)
असं रहस्य उलगडलं
तपासादरम्यान पोलिसांनी मुलीच्या फोनच शेवटचा कॉल ट्रेस केला. हा नंबर तिच्या एका मित्राचा होता. चौकशीदरम्यान संबंधित युवकाने सांगितलं की, 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याने संबंधित युवतीला दुचाकीवरून बाबांच्या आश्रमबाहेर सोडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ढोंगी बाबा संबोध दासची चौकशी केल्यानंतर या ढोंगीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी संबोध दासच्या माहितीनंतर, मुलीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Panjab, Rape