Home /News /crime /

2 क्विंटल जलेबी अन् 1000 पॅकेट समोसा! मतदारांना आकर्षित करण्याचा प्लॅन फसला, 10 जणांना अटक

2 क्विंटल जलेबी अन् 1000 पॅकेट समोसा! मतदारांना आकर्षित करण्याचा प्लॅन फसला, 10 जणांना अटक

पोलिसांनी उमेदवाराच्या घरी छापेमारी केली असून घरातून 2 क्विंटल जिलेबी आणि 1050 पॅकेट समोसे जप्त करण्यात आले आहेत. सोबतच दहा जणांना अटकही करण्यात आली आहे.

    उन्नाव, 11 एप्रिल: देशात कोणतीही निवडणूक (Election) असो मतदारांना आकर्षित करण्यासाठी ना-ना प्रकारचे लोभ उमेदवारांकडून दाखवले जातात. मग ती गावातील सरपंच पदाची निवडणूक असो वा लोकसभा निवडणूक असो, प्रत्येक निवडणूकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दारुचं किंवा पैशाचं वाटप केल्याच्या बातम्या आपण यापूर्वी वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण अलीकडेच 2 क्विंटल जिलेबी आणि 1000 समोसा पॅकेटच्या बदल्यात निवडणूक जिंकण्याचा प्लॅन पोलिसांनी अयशस्वी केला आहे. पोलिसांनी संबंधित उमेदवाराच्या घरी छापा टाकून 1050 समोसा पॅकेटसोबतचं जिलेबी बनवण्याचा कच्चा माल जप्त केला आहे. त्याचबरोबर उमेदवार महिलेच्या पतीसोबतच 10 जणांना अटकही केली आहे. त्यांच्यावर कोव्हिड-19 (COVID-19) नियमांचं उल्लंघन आणि आचार संहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून या ठिकाणी सध्या पंचायत निवडणूकीची धामधुम शिगेला पोहचली आहे. हसनगंज ब्लॉक परिसरात पिछवाडा गावचा रहिवासी असणाऱ्या राजूची पत्नी यावर्षी गावच्या प्रमुखपदाची दावेदार आहे. त्यामुळे राजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे त्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावात जिलेबी आणि समोसे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम शनिवारी पार पडणार होता. दरम्यान, कुणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हसनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकुल प्रकाश वर्मा आणि गुन्हे शाखेचे संजीव यादव यांनी संबंधित उमेदवाराच्या घरावर छापा टाकला. (हे वाचा- Unnao Rape Case: बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरच्या पत्नीला भाजपने दिलं तिकीट) पोलिसांनी घटनास्थळावरून दोन क्विंटल जलेबी आणि 1050 समोसे जप्त केले आहेत. त्याचबरोबर गॅस, भट्टी, मैदा, तूप आणि सिलिंडरही जप्त करण्यात आलं आहे. गावच्या प्रमुख पदाची उमेदवार असणाऱ्या महिलेचा पती राजू यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन आणि कोविड नियमांचा फज्जा उडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दहाही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Election, Uttar pradesh

    पुढील बातम्या