राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलढाणा, 24 जानेवारी : बुलढाण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रॅगिंगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ऑडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 5 जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 जानेवारी रोजी कैलास गायकवाड नावाच्या ITI च्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांनी मर्ग दाखल केला होता.
मात्र, काही दिवसांआधी मृत कैलास गायकवाड याने आपल्या मामाशी वस्तीगृहावर विद्यार्थी आपले कपडे काढून रॅगिंग करत असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर शिक्षकही विनाकारण शिवीगाळ करत असल्याचं या विद्यार्थ्याने आपल्या मामाकडे सांगितलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे.
यातून या विद्यार्थ्याला सोबतचे विद्यार्थी वस्तीगृहावर त्रास देत होते. तसेच त्याचे कपडे काढत होते. त्याचे व्हिडिओ काढत होते. त्याचबरोबर तेथील शिक्षकही विनाकारण त्याला शिवीगाळ करत होते, असं तो आपल्या मामांना रडत रडत सांगताना पाहायला मिळत आहे.
या ऑडिओ क्लीपच्या आधारावर आता पोलिसांनी तब्बल पाच जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह वस्तीगृह गृहपाल आणि एका शिक्षकाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह वसतीगृह गृहपाल याला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news, Crime news, Student