मुंबई, 17 जुलै: गेल्या दीड वर्षापासून जगभरात पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूच्या (Coronavirus) मगरमिठीतून सुटण्यासाठी लशीचा (Vaccine) उपाय सापडला आहे. त्यामुळं सगळ्या जगानं सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी लस घेण्याबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यातच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोविड-19ची (Covid-19) लागण होत असल्याचं आढळल्यानं या गैरसमजांना पुष्टी मिळत आहे. आपल्या अफाट लोकसंख्येच्या देशात लसीकरण वेगानं होणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत गैरसमजांमुळे लस न घेण्याकडे कल वाढल्यास हा धोका कायम राहू शकतो. त्यामुळं सर्व स्तरावर लसीकरण करून घेण्यासंबधी जागरूकता निर्माण केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होण्याबाबत संशोधन करून त्यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केला आहे. त्यांनी केलेल्या देशव्यापी अभ्यासातून या संसर्गाचं कारण स्पष्ट झालं आहे. लस घेतल्यानंतरही कोविड-19 होण्यासाठी कारणीभूत आहे तो कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Delta Variant). देशात हाहा:कार माजवणारी कोरोनाची दुसरी लाट पसरण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट अतिशय धोकादायक ठरला आहे. याच विषाणूमुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांना कोविड-19 झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असा निष्कर्ष आयसीएमआरनं ‘ब्रेक थ्रू’ नावाच्या आपल्या अभ्यासात नोंदवला आहे. एबीपी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.
हे वाचा-कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ
आयसीएमआरनं 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा अभ्यास केला. याकरता पहिला किंवा दोन्ही डोस घेतलेल्या 677 लोकांचे नमुने घेण्यात आले. यातील 604 जणांना कोव्हीशील्ड लस, 71 जणांना कोव्हॅक्सीन तर दोघांना सायनोफार्म लस देण्यात आली होती. 677 पैकी 86.09 टक्के लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं. यापैकी केवळ 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली तर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.4 टक्के होतं, असं या अभ्यासात आढळून आलं.
देशात येणारी तिसरी संभाव्य लाट रोखायची असेल तर लसीकरण (Vaccination) वाढवणं आवश्यक आहे. ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हे वाचा-सतर्क रहा! लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळल्यास जराही दुर्लक्ष करु नका
जगातील सर्वांत मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात राबवण्यात येत आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा कमी पडू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असून, नवनवीन लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देत आहे. सध्या आपल्या देशात भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन, ऑक्सफर्ड आणि अस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली आणि भारतातील सीरम इन्स्टीट्यूटनं उत्पादित होणारी कोव्हिशील्ड आणि रशियाची स्पुटनिक ही लस देण्यात येत आहे.
आतापर्यंत देशात 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 31 कोटी 61 लाख 16 हजार 189 लोकांनां लसीचा पहिला डोस तर 7 कोटी 92 लाख 27 हजार 578 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus