नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : अमेरिकी फार्मास्युटिकल कंपनीचं रेमडेसिविर हे औषध कोरोना विषाणू संक्रमणाला कमी करू शकतं असं आतापर्यंत मानलं जात होतं. पण कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात हे औषध अपयशी ठरलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) म्हटलं आहे. एका क्लिनिकल ट्रायलनंतर WHOने ही माहिती जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यावर हेच औषध देण्यात आलं होतं.
रेमडेसिविर हे औषध इबोला विषाणू, मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) आणि सिव्हियर रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) या आजारांवर उपयुक्त ठरलं होतं. MERS आणि SARS हे आजारही कोरोना विषाणूमुळेच होतात. मे महिन्यात कोविडच्या रुग्णांवर हे औषध चांगला परिणाम करत असल्याचं दिसून आलं होतं. तेव्हा कोरोनाचे काही रुग्ण रेमडेसिविर औषध घेतल्याने लवकर बरेही झाले होते, पण आता WHOने दिलेल्या माहितीमुळे रुग्णांना मोठा धक्का बसणार आहे.
WHO ने केल्या क्लिनिकल ट्रायल
जागतिक आरोग्य संघटनेनं 30 देशांतील 11 हजार 266 प्रौढ रुग्णांवर रेमडेसिविरच्या क्लिनिकल ट्रायल केल्या होत्या. यात रेमडेसिविरसोबतच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, अँटिएचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनवीर किंवा रीतोनवीर आणि इंटरफेरॉन तसंच चार संभाव्य ड्रग रेजिमेंट रुग्णांना देण्यात आले होते. याच क्लिनिकल ट्रायलचे निष्कर्ष आता आले आहेत. गुरुवारी या निष्कर्षांच्या अभ्यासातून डब्ल्युएचओला लक्षात आलं की रेमिडेसिवीर औषध दिल्याने रुग्णालयांत कोविड -19 चे उपचार घेणारे रुग्णांच्या तब्येतीवर किंवा त्यांच्या मृत्युच्या प्रमाणावर 28 दिवसांत कोणताच परिणाम झालेला नाही. या क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षांचा सखोल अभ्यास अजून करण्यात आलेला नाही. हा प्राथमिक अभ्यास प्रीप्रिंट सर्व्हर medRix वर अपलोड करण्यात आला आहे.
हे वाचा-कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांत 2 लशींना परवानगी, तिसरी लसही तयार
WHOच्या संशोधिका सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवारी सांगितलं होतं की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, लोपिनवीर किंवा रिशनवीर यांचा परिणाम होत नसल्याचं अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर जून महिन्यापासून त्यांचा वापर थांबवण्यात आला होता पण 30 देशांतल्या 500 हून अधिक रुग्णालयांमध्ये याच्या क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या. आता आम्ही मनोक्लोनल अँटिबॉडीजशी संबंधित संशोधनावर लक्ष ठेऊन आहोत आणि काही दिवसांतच त्याचे निष्कर्ष समोर येतील.’ ‘सध्या डब्ल्युएचओअंतर्गत 40 कंपन्या लस विकसित करत आहेत. त्यापैकी 10 कंपन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. या वर्षीचा शेवट किंवा 2021 च्या सुरुवातीपर्यंत आपल्याला लस मिळाली असेल,’असा विश्वासही स्वामीनाथन यांनी व्यक्त केला होता.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.