लसीमुळे कोरोनापासून 97.38 टक्के मिळतंय संरक्षण, प्रकृती बिघडण्याची शक्यताही केवळ 0.06 टक्के

लसीमुळे कोरोनापासून 97.38 टक्के मिळतंय संरक्षण, प्रकृती बिघडण्याची शक्यताही केवळ 0.06 टक्के

कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण (Vaccination) सर्वात मोठं आणि महत्तावाचं हत्यार मानलं जात आहे. अशात लसीकरणाबाबत झालेल्या नव्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे, की लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 16 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Corona) अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases) होणारी वाढ चिंतेत आणखीच भर टाकत आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत लसीकरण (Vaccination) हे सर्वात मोठं आणि महत्तावाचं हत्यार मानलं जात आहे. अशात नुकतंच लसीकरणाबाबत झालेल्या नव्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे, की लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले आहेत. तर, जे लोक लसीकरणानंतरही कोरोनाबाधित झाले आहेत, त्यातील केवळ 0.06 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासली आहे.

अपोलो रुग्णालयानं शनिवारी लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाबाधित झालेल्या लोकांचा अभ्यास करुन त्यातून हा निष्कर्ष काढला आहे. या अभ्यासात असं समोर आलं आहे, की कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तसंच लस घेऊनही ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावर आयसीयूमध्ये भर्ती होण्याची वेळ आली नाही किंवा मृत्यूचं प्रमाण शून्य आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयानं हा अभ्यास त्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर केला आहे, ज्यांच्यामध्ये कोविशिल्ड लस घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसाच्या आतच कोरोनाची लक्षणं जाणवली आहेत.


अपोलो हॉस्पिटल ग्रुपचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ. अनुपम सिब्बल यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं, की भारतात लसीकरण मोहिमेदरम्यानच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. याला ब्रेकथ्रू संक्रमण असं म्हटलं जातं. हे संक्रमण काही व्यक्तींना दोन्ही लसी घेऊनही होतं.

हा अभ्यास 3235 आरोग्या कर्मचाऱ्यांवर केला गेला आहे. अभ्यासादरम्यान असं निरिक्षणात आलं, की यातील 85 जण कोरोनाबाधित झाले. यातील 65 जणांना म्हणजेच 2.62 लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते. तर, 20 (2.65%) लोकांना केवळ एक डोस देण्यात आला होता. यावेळी विषाणूचा महिलांवर अधिक प्रभाव असल्याचं दिसून आलं. विशेष बाब म्हणजे, जास्त किंवा कमी वयाचा कोरोनाची लागण होण्यात काहीही फरक पडला नाही.

Published by: Kiran Pharate
First published: May 16, 2021, 5:39 PM IST

ताज्या बातम्या