लखनऊ 18 मे : कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग अनेकांची जिवाभावाची माणसं, मित्र, नातेवाईक यांना मृत्यूच्या दरीत ढकलत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं लहान मुलं, तरुण यांच्यावर जास्त हल्ला चढवल्याचं दिसत आहे. अगदी तरुण मुलं या कोरोनानं ओढून नेली आहेत. त्यांचे आई-वडील,बहिण-भावंड यांच्या दुःखाची कल्पनाही करणं शक्य होत नाही. असाच दुःखाचा डोंगर कोसळला आहे मेरठमधील (Meerut) ग्रेगरी राफेल (Gregary Rafel) यांच्यावर. त्यांच्या अवघ्या 24 वर्षांच्या जुळ्या तरुण मुलांचा कोरोनानं केवळ एका दिवसाच्या अंतरानं मृत्यू झाला आहे. नुकताच 23 एप्रिल रोजी या दोघांचा 24 वा वाढदिवस झाला होता. एकत्र शिक्षण घेतलेले, एकाच ठिकाणी नोकरी करणारे, कायम एकत्र असणारे हे जुळे भाऊ कायमचे जातानाही एकत्रच गेले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील ग्रेगरी राफेल रेमंड यांची जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी (Jofred Gregary) आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी (Ralfred Gregary) ही दोन जुळी मुले (Twins) होती. दोघांनीही एकत्रच कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं होतं आणि दोघेही हैद्राबादमधील(Hyderabad) एका कंपनीत नोकरी करत होते. या दोघांना 24 एप्रिल रोजी ताप आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं त्यांच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये होता. त्यामुळं घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. रेमंड यांना वाटलं होतं की दोघांचा ताप उतरेल; पण तसं झालं नाही. त्यांची तब्ब्येत बिघडतच गेली. दोघांची ऑक्सिजन पातळी 90च्या खाली जाऊ लागली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांना एक मे रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दोघांची पहिली कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली होती, मात्र काही दिवसांनी केलेली त्यांची आरटीपीसीआर चाचणी(RTPCR Test) निगेटीव्ह आली. त्यामुळं डॉक्टर त्यांना कोरोना वॉर्डमधून नॉर्मल आयसीयुमध्ये हलवण्याचा विचार करत होते. त्याआधीच 13 मे रोजी जोफ्रेड याचा मृत्यू झाला. त्यानंतर रेमंड यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला दिल्लीतील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, मात्र तो अंमलात आणण्याआधीच 14 मे रोजी राल्फ्रेड याचाही मृत्यू झाला. या जुळ्या भावांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही. हे दोघे बरे होऊन एकत्रच घरी येतील किंवा दोघेही परत येणार नाहीत,अशी एक हुरहूर रेमंड यांना होती.
आई-वडीलांना सुखी ठेवण्याचे दोघांचे स्वप्न होते. आपल्या शिक्षकाच्या नोकरीत दोघा मुलांना उत्तम शिक्षण देणाऱ्या रेमंड आणि त्यांच्या पत्नीनं आयुष्यभर संघर्ष केला होता. आता त्या दोघांना सगळी सुखं देण्यासाठी ही दोन्ही मुलं धडपडत होती. कोरियाला जाण्याचं नियोजन या दोघा भावांनी केलं होतं. कामासाठी जर्मनीलाही एकत्रच जाण्याची त्यांची इच्छा होती; पण त्यांची स्वप्नं, इच्छा अपुऱ्याच राहिल्या. आपल्या वृद्ध आई-वडिलांना एकटं ठेवून हे दोघेही भाऊ कायमच्या न संपणाऱ्या प्रवासाला निघून गेले. दोन्ही मुलांच्या मृत्यूनं कोलमडून गेलेले रेमंड, देवानं त्यांच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी हिसकावून घेऊन त्यांना इतकी मोठी शिक्षा का दिली, असा आर्त सवाल करत आहेत. याचं उत्तर कोणाकडेच नाही. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखानं सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus