मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

होम क्वारंटाईन बाप-लेकाचा मृत्यू, सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; दिव्यांग आईही गंभीर

होम क्वारंटाईन बाप-लेकाचा मृत्यू, सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; दिव्यांग आईही गंभीर

Representative Image

Representative Image

65 वर्षीय अरविंद गोयल आणि त्यांचा 25 वर्षाचा मुलगा ईलू गोयल यांचा मृतदेह (Dead Body of Corona Patient) घरातच आढळला आहे. त्यांच्या दिव्यांग पत्नीनं लोकांना माहिती देण्यासाठी आरडाओरडा केला मात्र उपयोग झाला नाही. महिलेची प्रकृतीदेखील गंभीर आहे.

पुढे वाचा ...
    लखनऊ 02 मे: देशात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) आणि मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशत्या लखनऊमध्येही कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकारी आकडेवारी आणि स्मशानातील चित्र यात बराच फरक जाणवत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर असताना रुग्णालयात जागा मिळत नसल्यानं अनेक रुग्णांचा घरीच मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. लखनऊमधून आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. इथे कृष्णा नगर ठाणा क्षेत्रातील एलडीए कॉलनीतील एका घरामध्ये होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) असलेल्या 65 वर्षीय अरविंद गोयल आणि त्यांचा 25 वर्षाचा मुलगा ईलू गोयल यांचा मृतदेह (Dead Body of Corona Patient) आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येऊ लागल्यानं घरातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शेजाऱ्यांनीच लोखंडी हातोड्याच्या मदतीनं घराचा दरवाजा तोडला. यानंतर घरामध्ये दोन मृतदेह आढळून आले. तर, 60 वर्षाची पत्नी रंजना गोयलही अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळालं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर या तिघांवरही घरातच उपचार सुरू होते. दिव्यांग असल्यानं ही महिला चालू शकत नव्हती. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर तिनं सर्वांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा आवाज घराबाहेर गेलाच नाही. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेजाऱ्यांनी सांगितलं, की चार दिवस आधीच अरविंद गोयल घरामध्ये फिरताना दिसले होते, मात्र त्यानंतर त्यांना कोणीही पाहिलं नाही. कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण परिसर शांत असल्यानं आणि लोक बाहेर पडत नसल्यानं याबाबत कोणालाही भनक लागली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील इतर सदस्यांबाबतही काही माहिती मिळाली नसल्यानं त्यांच्यावर पोलिसांकडूनच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसऱ्या एका घटनेत कृष्णा नगरच्याच सेक्टर डी - 1 मधील एका घरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृताची ओळख विवेक शर्मा अशी पटली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकदेखील कोरोनाबाधित होता आणि त्यानी स्वतःला घरीच क्वारंटाईन केलं होतं. शेजाऱ्यांनी त्याच्या मृत्यूची माहिती कुशी नगरमध्ये राहाणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याचा मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या