देशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

देशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

सध्या देशभरात सुरू झालेल्या कोरोनामुक्त गाव, शहर किंवा जिल्हा या संकल्पनेच्या आधीच या शहरानं ‘कोव्ही सेफ’ रोड (Covie Safe Road) हा एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

  • Share this:

इंदूर, 18 जून : सलग तीन वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहर (Cleanest City in Country) असल्याचा मान पटकावणारं इंदूर (Indore) नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या बाबतीतही नेहमीच आघाडीवर असते. कोरोना विषाणूच्या संसर्गातही या शहरानं विविध योजना राबवत या संकटाचा सामना केला आहे. सध्या देशभरात सुरू झालेल्या कोरोनामुक्त गाव, शहर किंवा जिल्हा या संकल्पनेच्या आधीच इंदूर शहरानं ‘कोव्ही सेफ’ रोड (Covie Safe Road)  हा एक अनोखा उपक्रम राबवला आहे. यामध्ये 100 टक्के लसीकरण (Vaccination) करून कोरोना मुक्त मार्ग करण्याचे आव्हान यात स्वीकारण्यात आलं आहे.

या अभिनव प्रकल्पाअंतर्गत शहरातील लँटर्न स्क्वेअर ते झंजीरवाला चौकापर्यंतचा रस्ता कोव्ही सेफ रोड करण्याचा शुभारंभ नुकताच स्थानिक आमदार आणि कॅबिनेट मंत्री तुळशीराम सिलावट यांच्या हस्ते करण्यात आला. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंडियन मेडिकल असोसिएशनचीही (Indian Medical Association) संकल्पना आहे. या प्रकल्पात प्रत्येक भागात एक हेल्पडेस्क (Help Desk) तयार करण्यात आला आहे, या शिवाय या मार्गावरील दुकानदार आपल्या ग्राहकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करणार आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांनी शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक दुकान, घरगुती व्यवसाय आणि व्यावसायिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.

हे ही वाचा-लहान मुलांना जुलैमध्ये देणार कोरोना लस; पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट तयार

‘लसीकरणाच्या बाबतीत इंदूर शहर दुसर्‍या क्रमांकावर असून, लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक एकत्र येऊन काम करत आहेत. लसीकरणामुळे हा परिसर विषाणूंपासून मुक्त होईल, असं तुळशीराम सिलावट यांनी सांगितलं. ‘गेल्या 20 दिवसात आम्ही या भागातील प्रत्येक दुकान, घर आणि संस्था यांना भेट देऊन माहिती संकलित केली आहे. जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात लस घेतलेल्या लोकांचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे लोक आता लस घेण्यासाठी पुढं येत असून त्यांना लस दिली जात आहे,’ अशी माहिती आयएमएचे पदाधिकारी सतीश जोशी यांनी दिली.

लसीकरणाबाबत जनजागृती करणे हे यामागचे मुख्य ध्येय आहे. एक मॉडेल एरिया म्हणून आम्ही या भागात हा प्रकल्प यशस्वी करून दाखवू इच्छितो. जेणेकरून इतर भागात आणि इतर शहरातदेखील असा प्रकल्प राबवता येईल. हे कोरोना-मुक्त क्षेत्र आहे, असा विश्वास लोकांना वाटला पाहिजे, असं मत या प्रकल्पातील एका स्वयंसेवकानं व्यक्त केलं.

या भागात एक ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं असून, अभय प्रशल या मेगा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक लसीकरण केंद्र आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, नियमित आरोग्य सर्वेक्षण करण्यासह, लसीकरणाबाबतच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पडेस्कही स्थापन करण्यात आला आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचंही आयोजन केलं जात आहे. पोलिस आणि रहदारी नियंत्रण करणारे कर्मचारीदेखील लोकांना कोविड-19च्या सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी जागरूक करत आहेत.

सुरुवातीला लॉकडाऊन असल्यानं या प्रकल्पात कोणाचा आणि कसा समावेश करायचा हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता आणि स्थानिकांनाही याबद्दल साशंकता होती, मात्र आता या प्रकल्पानं गती घेतली आहे, असं या प्रकल्पातील एका स्वयंसेवकानं सांगितलं.  2020 मध्ये आणि यंदा कोविड-19च्या दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट (Hotspot) ठरल्यानं तसंच आरोग्य कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे या सर्वात स्वच्छ शहराची प्रतिमा डागाळली होती. मात्र त्यानंतर या शहरानं आपली प्रतिमा उजळण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले असून त्याचे परिणामही दिसत आहेत. या होळकर घराण्याची राजधानी असलेल्या या शहरानं कोविड रुग्ण संख्या कमी करण्यात यश मिळवलं असून दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या चोवीस तासात इथं फक्त 36 रुग्णांची नोंद झाली आहे. तर भोपाळमध्ये 47 रुग्णांची नोंद झाल्यानं दैनंदिन रुग्णसंख्येच्या आधारावर इंदूर दुसऱ्या स्थानावर आले आहे.

एका दिवसात राज्यात केवळ 160 रुग्णांची नोंद झाली असून, राज्यभरात एकूण रुग्णांची संख्या 3237पर्यंत खाली आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अहवालात (Health Bulletin) देण्यात आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 18, 2021, 8:30 AM IST

ताज्या बातम्या