स्वतःला कोरोना संसर्ग होऊ न देण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय म्हणजे तोंडावर मास्क घालणं, असं जगभरातले शास्त्रज्ञ गेल्या वर्षीपासून सातत्याने सांगत आहेत. अनेक जण ते पाळतही आहेत; मात्र मास्क (Mask) घालण्याचा कंटाळा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. देशभरात त्यासाठी गोळा करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांच्या दंडाची रक्कम ऐकली तर यावर विश्वास बसेल. त्यातच नव्या एका शोधाने मास्कचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं आहे.
एकावर एक असे दोन मास्क (Double Masking) नाका-तोंडावर घट्ट बांधले, तर कोरोनाचा विषाणू नाका-तोंडापर्यंत येण्याची शक्यता दुपटीने कमी होते, असं एका नव्या शोधात आढळलं आहे.
'एम्स'चे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सांगितलं, 'खरं तर N-95 मास्कच प्रत्येकाने घालायला हवेत; पण ते प्रत्येकाला उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत डबल मास्क हा चांगला पर्याय आहे. आतला मास्क थ्री प्लाय सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असे दोन मास्क नाका-तोंडावर बांधावेत. तेही शक्य नसलं, तर दोन कापडी मास्क बांधावेत.'
हे ही वाचा-
N-95 मास्कचं फिल्टरेशन (Filteration) 90 टक्के प्रभावी असतं. सर्जिकल मास्क (Surgical Mask) 85-90 टक्के प्रभावी असतात आणि कापडी मास्क त्यापेक्षा कमी प्रभावी असतात, असं डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं. 'मास्क परिधान करणं, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या नाका-तोंडात येणारी हवा गाळून आली पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नाही तर संसर्गाचा धोका आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर मास्क आत खेचला गेला, तर तुम्ही तो नीट घातला आहे असा त्याचा अर्थ,' असं त्यांनी सांगितलं.
जामा इंटर्नल मेडिसीन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटलं आहे, की केवळ फिल्टरेशन वाढवणं एवढाच दोन मास्कचा हेतू नाही, तर मास्क नीट न बसल्यामुळे कुठे फट शिल्लक राहिली असेल, तर तो धोकाही दोन मास्कमुळे उरत नाही. हे संशोधन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं, त्या अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतल्या सहयोगी प्राध्यापिका एमिली सिकबर्ट-बेनेट यांनी सांगितलं, 'मेडिक प्रोसीजर मास्कमध्ये फिल्टरेशनची चांगली क्षमता असते; मात्र ते आपल्या चेहऱ्याला ज्या पद्धतीने बसतात, ती योग्य नाही.'
हे ही वाचा-घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास काय करावं? पाहा हा VIDEO
फिल्टरेशनची क्षमता (Filtertion Efficacy) मोजण्यासाठी शास्त्रज्ञांच्या टीमने 10 फूट बाय 10 फूट आकाराचा स्टेनलेस स्टील एक्स्पोजर चेंबर (Exposure Chamber) तयार करून त्यात क्षाराचे कण एअरोसोल स्वरूपात सोडले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून मास्क घातले. शास्त्रज्ञाच्या मास्कमध्ये येणारे एअरोसोल्स मोजण्याची, तसंच एक्स्पोजर चेंबरमधल्या एअरोसोल्सचं (Aerosols) प्रमाण मोजण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्या एक्स्पोजर चेंबरमध्ये शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या हालचाली करण्यास सांगण्यात आल्याचं फिलिप क्लॅप यांनी सांगितलं.
या संशोधनातून असं आढळलं, की मास्कमधून किती प्रभावीपणे फिल्टरेशन होतं, याचं प्रमाण व्यक्तिपरत्वे बदलतं. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर मास्क कशा प्रकारे फिट होतो, यातही वेगळेपणा असतो. एकंदर विचार करता मेडिकल प्रोसीजर मास्क कोरोना विषाणूच्या आकाराचे कण गाळण्यात 40 ते 60 टक्के प्रभावी ठरू शकतो. साधा कापडी मास्क 40 टक्के प्रभावी असतो, असं संशोधनात आढळलं.
जेव्हा सर्जिकल मास्कवर कापडी मास्क लावला जातो, तेव्हा त्याची फिल्टरेशन करण्याची क्षमता 20 टक्क्यांनी वाढते. स्नग फिटिंग, स्लीव्ह टाइप मास्क वापरले, तर फिल्टरेशन क्षमता आणखी वाढते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. प्रोसीजर मास्कच्या वर कापडी मास्क लावला, तर फिटिंग वाढतं आणि मधल्या फटी भरून निघायला मदत होते. त्यामुळे नाक आणि तोंड चांगल्या प्रकारे झाकायला मदत होते. कापडी मास्कवर मेडिकल प्रोसीजर मास्क घातला, तर गाळण्याची क्षमता 16 टक्क्यांनी वाढते.
हे ही वाचा-कोरोनाने 15 दिवसांत संपूर्ण कुटुंब संपवलं
- मास्क कुठे कुठे घालावा?
- घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी मास्क घालणं आवश्यक.
- हॉस्पिटल, बँक, बाजार, पार्क, ऑफिसेस अशा ठिकाणी जाताना
- सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात
- खासगी वाहनात
- धावताना किंवा व्यायाम करताना मास्क घालू नये.
- मास्क घालण्याची योग्य पद्धत
- हात स्वच्छ धुतल्यानंतर मास्क हातात घ्या.
- मास्क तुमच्या गळ्याभोवती किंवा कपाळावर लावू नका. तो केवळ नाक-तोंडावरच लावायचा आहे.
- मास्क नीट लावला असल्याची खात्री करा. त्यातून नाक बाहेर येऊ देऊ नका.
- तुम्हाला श्वास नीट घेता येतोय याची खात्री करा.
- मास्कला समोरून स्पर्श करू नका. मास्क कानाला बांधायच्या दोऱ्यांच्या साह्यानेच उचला.
- घरी आल्यानंतर मास्क काढा. कापडी मास्क असेल, तर एकदा वापरल्यावर स्वच्छ धुऊन वाळवून पुन्हा वापरा.
- कागदी मास्क असेल, तर एकदा वापरल्यानंतर योग्य तऱ्हेने त्याची विल्हेवाट लावा.
- मास्क काढताना डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका.
- मास्क काढल्यानंतरही हात स्वच्छ धुवा.
- मास्क एटिकेट्स
- मास्क योग्य पद्धतीने वापरायला हवेत आणि वापर झाल्यावर त्यांची विल्हेवाटही (Disposal) योग्य पद्धतीने लावायला हवी. कोरोनापासून वाचण्यासाठी लोक मास्क, ग्लोव्ह्ज किंवा पीपीई किट्स (PPE Kits) घालतात आणि नंतर निष्काळजीपणे फेकून देतात. अनेक किनाऱ्यांवरही त्याचा कचरा आढळला आहे.
ओशन काँझर्व्हन्सी ग्रुपच्या माहितीनुसार, 2020च्या दुसऱ्या सहामाहीत जगभरातल्या समुद्रकिनाऱ्यांवरून एक लाख सात हजार पीपीई किट्स कार्यकर्त्यांनी गोळा केली. गेल्या महिन्यातल्या आकडेवारीनुसार, त्यांच्या एकंदर स्वच्छता मोहिमांपैकी 94 टक्के मोहिमांमध्ये फेकलेली पीपीई किट्स आढळली आणि त्यात 80 टक्के मास्क्स होते.
मास्क अशा घटकांपासून बनलेले असतात, की ज्यांचं विघटन होण्यास 450 वर्षं लागू शकतात. काही सागरी पक्षी मास्कमध्ये अडकत असल्याच्याही घटना घडत आहेत. तसंच, चुकून अन्न म्हणून मास्क, ग्लोव्हज सागरी प्राण्यांकडून खाल्ले गेले, तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
युरोपीयन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक अँड्रिया अॅमोन यांनी सांगितलं, की लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव पूर्णतः ओसरेपर्यंत शारीरिक अंतर राखण्यासारखे उपाय करण्याला पर्याय नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.