मुंबई, 24 नोव्हेंबर: कोव्हिड 19 (Corona 19)चा प्रादुर्भाव वाढत असला तरी जागतिक पातळीवर लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर विमान कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती असतानादेखील लोकही आपल्या आवश्यकतेनुसार विमानप्रवास करत आहेत. सीडीसीच्या माहितीनुसार, प्रवासामुळे कोव्हिड 19च्या संसर्गाची आणि फैलावाची जोखीम वाढते. अर्थात, विमान प्रवासामुळे झालेल्या प्रसाराची अचूक टक्केवारी
काढणे शक्य झालेले नाही. मात्र खुल्या जागेपेक्षा बंद जागेत संसर्गाची अधिक शक्यता असल्याचा निष्कर्षाने संशोधनातून पुढे आला आहे.
हार्वर्ड पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जोसेफ यांच्या माहितीनुसार, संसर्गजन्य रोगांच्या बाबतीतील विमानसेवेतील सुरक्षिततेचा अहवाल उत्तम आहे. कारण विमानात प्रवासी जो श्वासोच्छावास करतात ती हवा शुद्ध केलेली असते. बहुतेक विमानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या हवेमध्ये 50 टक्केच हवा बाहेरची असते तर 50 टक्के हवा एचईपीए फिल्टर्सच्या माध्यमातून शुद्ध केलेली असते. मोठ्या व्यावसायिक जेट विमानांमध्ये तर एचईपीए फिल्टर्सनी युक्त उच्च दर्जाची एअर कंडिशनर यंत्रणा असते. त्यामुळे यात असलेल्या हवेतून 99.97 टक्के धूळ, परागकण, जीवाणू आणि इतर अगदी 0.3 मायक्रॉन्स आकाराचे सूक्ष्म कणदेखील दूर केले जातात. कोरोनाचा विषाणू तर 0.006 ते 1.4 मायक्रॉन्स आकाराचा असतो. त्यामुळे एअर कंडिशनर यंत्रणा योग्य रीतीने कार्यरत असेल आणि विमानातील प्रत्येकाने मास्क लावलेला असेल तर संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी होते.
विमान प्रवास करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात?
जितका अधिक काळ तुम्ही गर्दीत राहाल, तेवढा धोका वाढतो. तुम्ही दीर्घकाळ विमानात असाल तर तुमचा संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे जास्त वेळ एकाच विमानात प्रवास करणं टाळा. तुमचा एकूण प्रवास पाच तासांचा असेल तर कनेक्टिंग फ़्लाईट्स घ्या ज्यामुळे शुद्ध हवेशी तुमचा संपर्क वाढेल.
विमानतळावर जाताना नियोजन करा
विमातळावर तुम्हाला सोडण्यासाठी ड्रायव्हर किंवा तुमचे कुटुंबीय येणार असतील, तर त्यांनी मास्क घातलेला आहे याची खात्री करा. विमानतळावर जाताना गाडीच्या खिडक्या बंद करू नका.
संपूर्ण प्रवासात योग्य मास्क घाला
तुमचे तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल असा मास्क घाला. मास्क व्यवस्थित बसला पाहिजे. विमानप्रवासात उत्तम दर्जाचा थ्री-प्लाय मास्क वापरा.
फेसशिल्ड वापरा
तुम्हाला अधिक धोका असेल तर मास्कवर फेसशिल्ड जरूर वापरा. असा सल्ला एमोरी विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. हेन्री वू यांनी दिला आहे.
आवश्यक गोष्टी आठवणीने जवळ बाळगा
सॅनिटायझर, वाईप्स जरूर जवळ ठेवा. तुमचं सीट, आर्म रेस्ट आणि सीट बेल्ट सॅनिटायझर वाईप्सने स्वच्छ करा. तुमची स्वतःची उशी, ब्लँकेट बरोबर न्या.
विमानात बसल्यावर सतत जागेवरुन उठणं टाळा
गरज असेल तेव्हाच आपल्या जागेवरून उठा. प्रवासातून आल्यावर विलगीकरणात रहा. विमानप्रवास करून आल्यानंतर किमान 10 दिवस विलगीकरणात रहा. तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे.