नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : जगभरात सध्या 2 कोटी 47 लाख 76 हजार कोरोना रुग्ण आहेत. तर, 8 लाख 37 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थिती कोरोनाची लस कधी येणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. रशिया आणि चीन यांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असला तरी ही लस किती सुरक्षित आहे, याबाबत अद्याप शाश्वती देण्यात आली नाही आहे. यातच आता थायलंडच्या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांपासून कोरोना लस विकसित केल्याचा दावा केला आहे.
थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले की, स्थानिक पातळीवर निर्माण तयार करण्यात आलेल्या या लशीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ही चाचणी माकडावर करण्यात आली होती. थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी सांगितले की, व्हायरसचा डीएनए तंबाखूच्या पानात एकत्रिकरण करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्या डीएनएला झाडाकडून चांगला प्रतिसाद मिळतो त्यानंतर त्यात प्रथिने तयार होतात, असेही त्यांनी सांगितले.
वाचा-धक्कादायक! एका दिवसात आढळले कोरोनाचे 78 हजार नवे रुग्ण
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या लशीचा ट्रायल माकड आणि उंदिरांवर करण्यात आला, अद्याप मानवी चाचणी करण्यात आलेली नाही. लवकरच पुढच्या टप्प्यात मानवी चाचणी करण्यात येणार असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले. ही लस तयार करण्यासाठी प्रथिनांचा अर्क काढून घेण्यात येतो. शास्त्रज्ञांच्या मते ही लस अगदी औद्योगिक स्तरावरही उत्पादित करणे सोपे आणि स्वस्त आहे.
वाचा-अभिमानास्पद! आशियात पहिल्यांदा कोरोनाग्रस्तावर फुफ्फुसाचं यशस्वी प्रत्यारोपण
फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनाच्या 'या' 2 लशी
भारतात 2021 च्या सुरूवातीला कोरोनाच्या दोन लशी बाजारात उपलब्ध होतील अशी माहिती मिळाली आहे. बर्नस्टेन यांनी एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर फेब्रुवारी-मार्च पर्यंत 4 लशी उपलब्ध होतील. यापैकी दोन लशी ‘एस्ट्राजेनेका व ऑक्सफोर्ड व्हायरल वेक्टर लस आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब्यूनिट लशीसाठी भारतनं भागीदारी केली आहे. या दोन्ही लशी साधारण 2021 मार्चपर्यंत भारतात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. या लशीची किंमत 225 ते 250 रुपये असू शकते असाही कयास आहे. सीरम इंस्टिट्यूट साधारण 2021मध्ये 60 कोटी तर 2022 पर्यंत एक अब्ज लशीचं उत्पादन होऊ शकतं अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.