मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात कोरोनाचा कहर; काय करावं अन् काय करू नये? सरकारनं जारी केल्या सूचना

देशात कोरोनाचा कहर; काय करावं अन् काय करू नये? सरकारनं जारी केल्या सूचना

Corona in maharashtra

Corona in maharashtra

देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आल्याचं आता स्पष्ट झालं असून लोकांनी पूर्वीप्रमाणेच दक्षता बाळगणं अत्यावश्यक आहे. याबाबत सरकारनंही जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.

मुंबई 22 मार्च : कोरोनावरील (Corona Virus) लस (Vaccine) आल्यानं आता पुन्हा पूर्वीसारखा जीवनगाडा सुरळीत चालेल असा दिलासा मिळालेल्या जनतेवर पुन्हा कोरोनाचं संकट तीव्र झाल्यानं चिंतेचं वातावरण आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आल्याचं आता स्पष्ट झालं असून लोकांनी पूर्वीप्रमाणेच दक्षता बाळगणं अत्यावश्यक आहे. याबाबत सरकारनंही जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. या काळात काय काळजी घ्यावी आणि काय करू नये यासाठी मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केल्या आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

देशात गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 846 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या जवळपास चार महिन्यांतली एका दिवसात झालेली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यामुळं देशात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याचं स्पष्ट होत आहे. कोविड-19 च्या रुग्णसंख्येतील सर्वात जास्त वाढ पंजाब (Punjab), महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तामिळनाडूमध्ये (Tamil nadu) दिसून येत आहे. इतक्या प्रचंड वेगानं वाढत असलेल्या रुग्णसंख्येमागं लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री (Central Health Ministry) डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Wardhan) यांनी म्हटलं असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी कोरोनाबाबतच्या सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, अन्यथा परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘कोणत्याही परिस्थितीत लोकांनी कोविड-19साठी (Covid -19) घालण्यात आलेल्या सुरक्षा नियमांच्या पालनात हलगर्जी करू नये. कोरोनाच्या विरूद्धचा हा लढा जिंकण्यासाठी सामाजिक अंतर राखणं, मास्क घालणं आणि वारंवार साबणानं हात धुणं ही सर्वात मोठी साधनं आहेत, तर कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लसी या संसर्गाविरूद्ध लढण्याचं दुसरं साधन आहे. देशभरात या लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात फैलावत असलेली कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन लागू करणं, निर्बंध पाळणं अत्यंत आवश्यक आहे, असं सांगितलं. वेळीच ही साथ थांबविली नाही, तर देशभर त्याचा उद्रेक होऊ शकेल. त्यामुळं ही साथ रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत, ही निर्णायक वेळ आहे, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

देशभरात पहिल्यांदा पसरलेली साथ नियंत्रणात येण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा कोविड -19चा संसर्ग अत्यंत वेगानं वाढत आहे. पहिल्या लाटेतील संसर्गानंतर रुग्णांच्यासंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असताना पुन्हा या विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोविड-19ची दुसरी लाट अत्यंत तीव्र असून ही परिस्थिती चिंताजनक आहे. या दुसऱ्या लाटेत संसर्ग होण्याचा वेग गेल्या वेळच्या तुलानेत अधिक आहे, मात्र दिसणारी लक्षणे किंवा आजाराची तीव्रता मध्यम आहे, असं साथरोग तज्ज्ञांनी (Epidemiological experts) म्हटलं आहे. कर्नाटकमध्येही (Karnataka) आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली असून, लोकांनी संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे.

कोविड-19च्या रोखण्यासाठी काय करावं आणि काय करू नये :

सुरुवातीला पाहू काय करावं :

- वैयक्तिक स्वच्छता ठेवा. नियमितपणे साबणानं किमान 20 सेकंद हात धुवा.

- घराबाहेर पडताना अँटी-बॅक्टेरियल हँड सॅनिटायझर घ्या आणि नियमितपणे वापरा.

- घराबाहेर पडताना नेहमीच फेस मास्क घाला.

- खोकताना किंवा शिंकताना नेहमी आपलं तोंड टिश्यू किंवा रुमालानं झाकून घ्या.

- बाहेर असताना, मास्कच्या आत खोका किंवा शिंका. खोकताना किंवा शिंकताना मास्क काढू नका.

- टिश्यू वापरल्यानंतर ताबडतोब कचऱ्याच्या बंद डब्यात फेकून द्या.

- पीपीई किटस, मास्क आणि हातमोजे यांच्यासह संरक्षक वस्तूंच्या योग्य विल्हेवाटीची खात्री करा.

- सार्वजनिक ठिकाणी इतरांपासून नेहमीच 6 फूट अंतर ठेवा.

- शक्य असल्यास घरूनच काम करा.

- आपल्याला बरं वाटत नसल्यास घरीच रहा. आपल्याला ताप असेल, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तातडीनं वैद्यकीय मदत घ्या.

काय करू नये :

- शक्यतो आपल्या चेहऱ्याला, विशेषत: डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा.

- गर्दीच्या ठिकाणी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.

- मॉल, जिम, रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये जाऊ नका. अशा ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखणं कठीण आहे.

- शहरांतर्गत, राज्यांतर्गत किंवा देशांतर्गत अनावश्यक प्रवास टाळा.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय अर्थात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्यावतीनं कर्मचार्‍यांसह मंत्रालयं, विविध विभाग यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. त्यामध्ये खबरदारीच्या उपाययोजना नमूद करण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

- शक्यतो सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर उपलब्ध करा. हँड सॅनिटायझरची सोय करणं अनिवार्य आहे. फ्लूसारखी लक्षणे आढळणाऱ्या लोकांना योग्य उपचार घेणं तसंच विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला द्या.

- कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध घाला. पास देऊन लोकांना येण्याची सुविधा स्थगित करा. अधिकाऱ्यांनी ज्या लोकांना महत्त्वाच्या कामासाठी भेटण्याची परवानगी दिली असेल, अशा लोकांनाच योग्य प्रकारे तपासणी केल्यानंतर परवानगी द्या.

- शक्य तितक्या मीटिंग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कराव्यात. मोठ्या संख्येनं लोकांचा समावेश असलेल्या बैठका कमी करा किंवा त्या पुढे ढकला.

- अनावश्यक प्रवास टाळा.

- अधिकृत ईमेलवर आवश्यक पत्रव्यवहार करा आणि शक्य तितक्या प्रमाणात इतर कार्यालयांमध्ये फायली आणि कागदपत्रे पाठवणे टाळा.

- कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच येणारे टपाल घेण्याची आणि त्याची पोचपावती देण्याची व्यवस्था करा.

- सरकारी कार्यालयांमधील व्यायामशाळा, करमणूक केंद्रं आणि पाळणाघरं बंद करा.

- कामाच्या ठिकाणी विशेषत: जिथं वारंवार हाताचा स्पर्श होतो अशा ठिकाणांची वारंवार साफसफाई, स्वच्छता केली जात असल्याची खात्री करून घ्या.

- वॉशरूम्समध्ये हँड सॅनिटायझर्स, साबण आणि पाणी याचा मुबलक पुरवठा होत असल्याची खात्री करा.

- सर्व अधिका्यांनी स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी. श्वसनाला त्रास, ताप अशी लक्षणं दिसत असेल किंवा बरं वाटत नसेल तर त्यांनी आपल्या वरीष्ठांना त्याबद्दल माहिती देऊन ताबडतोब कार्यालय सोडलं पाहिजे. त्यांनी आरोग्य मंत्रालय आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गृह-विलगीकरणात राहणं अत्यावश्यक आहे.

- खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रजेची मागणी केल्यास ती रजा मंजूर करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

- जास्त जोखीम असलेल्या म्हणजेच ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती कर्मचारी आणि ज्या वैद्यकीय उपचार घेत असलेले कर्मचारी यांना अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला द्या. मंत्रालय आणि विविध विभागतील अशा कर्मचार्‍यांचा जनतेशी थेट संपर्क साधण्यासारख्या कामांमध्ये समावेश करू नये.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Maharashtra, PM narendra modi, Punjab, Tamil nadu