Home /News /coronavirus-latest-news /

फक्त नाक-तोंडच नाही तर कानावर परिणाम; कोरोना बहिरं करत असल्याचा संशोधकांचा दावा

फक्त नाक-तोंडच नाही तर कानावर परिणाम; कोरोना बहिरं करत असल्याचा संशोधकांचा दावा

कोरोना (corona)नंतर आता त्याचे साईड इफेक्ट्सही समोर यायला लागले आहेत. कोरोना झाल्यानंतर काही लोकांची ऐकण्याची क्षमता नाहीशी झाली असं दिसून आलं आहे. पण घाबरुन जाऊ नका, यावर संशोधन सुरू आहे आणि काही उपचारानंतर बहिरेपणा कमी झाल्याची उदाहरणही समोर आली आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 ऑक्टोबर: कोरोना (Corona)मुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोनातून रुग्ण बरे होतात पण कोरोनामधून बरं झाल्यानंतर त्याच्या साईड इफ्टेक्ट्लाही बरेचदा समोरं जावं लागतं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे लोकांची ऐकण्याची क्षमता जाऊ शकते, ते बहिरे होऊ शकतात. संशोधनामधून काय समोर आलं? ब्रिटनमध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला असून यातून अनेक कोरोना रुग्णांना बहिरेपणा आला आहे. असं असलं तरीही अशा रुग्णांची संख्या तुलनेत कमी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांच्या म्हणण्यानुसार रुगणांमध्ये याबाबतीत जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. याचं निदान झाल्यानंतर स्टेरॉईडच्या माध्यमातूनही समस्या दूर केली जाऊ शकते, असंही  शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी फ्ल्यूने सुद्धा ही समस्या उद्भवू शकते, असं मतही त्यांनी नोंदवलं आहे. एरवी सर्दी पडसं झालं की आपल्या कानांनाही दडे बसतात. ऐकू येत नाही. पण पूर्ण बहिरेपणा आल्याच्या खूप कमी केसेस आहेत. बीएम जे केस रिपोर्टमध्ये प्रकाशित अहवालानुसार एका दम्याच्या 45 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली. यामुळे त्याची ऐकण्याची क्षमता अचानक नाहीशी झाली, त्याला ऐकायला येत नव्हतं. कोरोना होण्यापूर्वी त्याला ऐकण्याबद्दल कोणतीच अडचण नव्हती. त्याला अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित ऐकू येत होतं. यानंतर त्याला स्टेरॉईडच्या गोळ्या आणि काही लसी दिल्या गेल्या. या उपचारांमुळे त्याला काही प्रमाणात पुन्हा ऐकायला येऊ लागलं. कोरोनाने जर ही समस्या उद्भवत असेल तर यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनानंतर अनेक रुग्ण विविध समस्यांशी झगडत असल्याचं समोर आलं आहे.अनेकांना महिनोंमहिने श्वास घेण्यास त्रास होतो. काही जणांना धाप लागणे, अशक्तपणा अशा समस्या समोर आल्या. आधीच जग कोरोनानी इतकं भयभीत झालं आहे की, लोकांना कोरोनाची लागण झाली की आपण मरणार असं वाटू लागलं. त्यात अशा माहितीमुळे कोरोनाची भीती अधिकच वाढली आहे. यावरही अधिक संशोधनाची गरज असल्याचे समोर आलं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या