बापरे! एकच मोबाईल नंबर आणि सात हजार जणांची कोरोना चाचणी; हे प्रकरण नेमकं काय?

बापरे! एकच मोबाईल नंबर आणि सात हजार जणांची कोरोना चाचणी; हे प्रकरण नेमकं काय?

एकाच मोबाईल नंबरवर सात हजारहून अधिक लोकांची कोरोना तपासणी केली गेली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागात ( Health Department) एकच गोंधळ उडाला आहे.

  • Share this:

बरेली 11 एप्रिल : उत्तर प्रदेशात ( Uttar Pradesh) कोरोना ( Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच इथे कोरोना तपासणीमध्ये मोठी गडबड होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. बरेलीमधून कोरोना तपासणीबाबत समोर आलेलं असंच एकच प्रकरण थक्क करणारं आहे. इथे एकाच मोबाईल नंबरवर सात हजारहून अधिक लोकांची कोरोना तपासणी केली गेली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागात ( Health Department) एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता सगळे विभागीय अधिकारी स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळी उत्तरं देताना दिसत आहेत.

कोरोना चाचणीतील गोंधळाचं हे प्रकरण बरेलीमधील आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभाग चर्चेत आला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये सात हजाराहून अधिक सॅम्पलसाठी एकच मोबाईल नंबर वापरला गेला आहे. म्हणजेच तपासणी करणाऱ्या तब्बल सात हजार जणांचा मोबाईल नंबर सारखाच आहे. प्रकरणी चर्चेत आल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहेत.

विभागाचं असं म्हणणं आहे, की एक लाखाहून अधिक जणांची तपासणी झाली आहे आणि यातील पाच ते सात टक्के लोकांकडे मोबाईल नसतात. यावर बोलताना जिल्हा निरीक्षक अधिकारी डॉ. रंजन गौतम म्हणाले, की संगणकात एन्ट्री पूर्ण करण्यासाठी विभागातील कर्मचारी आपला कोणताही नंबर टाकतात. विना नंबर अपूर्ण फॉर्म संगणक घेत नाही. हे अतिशय वाईट आहे, की अशा परिस्थितीतही लोक चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत.

उत्तर प्रदेशमध्येदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. इथे हजारो डॉक्टर आणि आरोग्य विभागातील स्टाफलाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासात 12787 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 58801 इतकी आहे. मागील चोवीस तासात 2207 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 11, 2021, 7:37 AM IST

ताज्या बातम्या