शेवटच्या टप्प्यात टेस्ट करणाऱ्या 9 लशींच्या यादीत रशियन लस नाही; WHO ने जगाला केलं सावध

शेवटच्या टप्प्यात टेस्ट करणाऱ्या 9 लशींच्या यादीत रशियन लस नाही; WHO ने जगाला केलं सावध

रशियन कोरोना लशीच्या (russian corona vaccine) सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित होत असताना 20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिली आहे.

  • Share this:

जिनिव्हा, 14 ऑगस्ट : रशियाने जगातील सर्वात पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार करून ती बाजारात आणण्याची तयारीही सुरू केली. लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. 20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) रशियन लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करत जगाला सावध केलं आहे.

जगातील 9 कोरोना लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र यामध्ये रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचा समावेश नाही. या लशीबाबत आपल्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित असेल हे सांगू शकत नाही, असं WHO ने म्हटलं आहे.

जगाला कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मिळून Covax facility ही प्रणाली तयार केली आहे. ज्याअंतर्गत या लशींची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी नोंद झालेल्या लशींसाठी इतर देशांनाही भागीदार होण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं आहे जेणेकरून या लशींच्या उत्पादनांसाठी निधी मिळेल आणि देशांनाही लस उपलब्ध होईल.

हे वाचा - ...तरच भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रुस आयलवर्ज म्हणाले, "रशियाच्या लशीबाबत काहीही निष्कर्ष देण्यासाठी आमत्याकजे पुरेशी माहिती उपलब्ध नाही आहे. लशीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि उत्पादनाबाबत जाणून घेण्यासाठी आमची रशियाची चर्चा सुरू आहे. त्यांनी चाचण्या कशा केल्या आणि त्यांचं पुढचं पाऊल काय आहे, हे आम्ही जाणून घेत आहोत"

जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लस sputnik-v बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर रशियाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक अलेक्झांडर यांनी राजीनामा दिला. डॉक्टर अलेक्झांडर हे रशियामधील सर्वोच्च डॉक्टरांपैकी एक मानले जातात.

डॉक्टर अलेक्झांडर म्हणाले, "लस बनवण्यामध्ये वैद्यकीय शास्त्रांच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. sputnik-v लशीसाठी आवश्यक मंजुरी घेतली गेली नव्हती आणि घाईघाईने त्याची घोषणा केली गेली" अलेक्झांडर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ही लस सुरक्षित राहील याची शाश्वती नाही.

हे वाचा - संजय राऊत आता WHO वर घसरले; 'Coronavirus चा प्रसार WHO च्या नादाला लागल्यामुळेच!

दरम्यान भारतातही ही लस देण्यापूर्वी लशीसंबंधित सर्व बाबींचा गांभीर्याने तपास केला जाईल आणि मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या