मुंबई, 05 फेब्रुवारी: देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला या लसीकरण मोहिमेची सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना (health workers) कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे. पण यामध्ये घोटाळा होत असल्याची माहिती समोर येत आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनाच लस देण्यात येण्याचा कडक नियम आहे. पण डॉक्टर यामध्ये घोटाळा करत असून आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगून कोरोनाची लस देत असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रातील अमरावतीमधील अचलपूर जिल्हा उपरुग्णालयात अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना ही लस दिल्याचं समोर आलं आहे. सरकारी नियमांनुसार केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून अनेक ठिकाणी याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई आणि गोव्यामध्ये देखील अशाच प्रकारे नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार अचलपूरमधील भन्साळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आशिष भन्साळी यांनी आपल्या कुटुंबातील आणि मित्र मंडळींमधील 19 व्यक्तींना कोरोनाच्या लशीचा पहिला डोस दिल्याचं समोर आलं आहे. या सर्व व्यक्तींची आरोग्य कर्मचारी म्हणून नोंद करून लसीकरण केलं आहे. यामध्ये त्यांचा मित्र आणि व्यावसायिक मनीष अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीचादेखील समावेश आहे.
हे वाचा - वुहानच्या त्या लॅबमध्ये गेली WHO ची टीम; कोरोनाबाबत केला धक्कादायक खुलासा
अग्रवाल यांनी आजूबाजूच्या नागरिकांना यासंबंधात सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर ही घटना समोर आली असून डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. यावेळी कुटुंबातील सदस्यांना देखील लस देऊ शकतो, असं वाटल्यामुळे आपण हे केल्याचं सांगत सारवासारव केली. भन्साळी यांच्याप्रमाणेच डेन्टल डॉक्टर असलेले दीपक वर्मा यांनी देखील असाच कारनामा केला आहे. यानंतर आता या व्यक्तींना कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यात येणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
हे वाचा - कोरोना संसर्गाचा आकडा घसरला, पण धोका कायम; भारतासाठी चिंताजनक बातमी
अचलपूरमधील लसीकरण केंद्रावरील डॉक्टर सोनिया तिवारी यांनी लसीकरणाला येणाऱ्या व्यक्तींचा तपास करणं खूप अवघड गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. अचलपूर जिल्हा उपरुग्णालयात ही घटना समोर आल्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या ओळखपत्राची मागणी करत असल्याचं सुप्रिटेंडेंट डॉक्टर सुरेंद्र डोळे यांनी म्हटलं आहे. आम्ही आतापर्यंत 800 नागरिकांना लस दिली असून यामधील 20 जण आरोग्य कर्मचारी नसून अनेक ठिकाणी असं होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Vaccination