मुंबई, 07 नोव्हेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास(Shaktikanta Das) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांनी स्वत: ट्वीटरवरुन ही माहिती दिली. पुढच्या आठवड्यापासून ते पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील. 25 ऑक्टोबर रोजी दास यांचा कोरोना (Corona) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण त्यांनी जिद्दीने कोरोनावर मात केली आहे.
शक्तिकांत दास यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी पुढच्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करणार आहे. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद”
I have tested COVID-19 negative. Will be back in office next week. Thank you everyone for your good wishes for my early recovery.
कोरोनाची लक्षणे नाहीत, प्रकृतीही चांगली आहे, सध्या मी क्वारंटाइन झालो आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्या सगळ्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. बँकेचं कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहे आणि राहीन असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाची काय परिस्थिती?
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट कायम आहे. शनिवारी 3959 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 6748 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 15,69,090 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या एकूण 99,151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.53% झाले आहे अशी माहितीही टोपे यांनी दिलं आहे. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने काळजी घेणं आवश्यक आहे.