नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटाने अनेक संकट आणि समस्या निर्माण झाल्या असल्या तरीही काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. जसंकी नद्यांचं प्रदूषण कमी झालं, हवेत शुद्धता आली लोकांच्या वाईट सवयी सुटायला सुरुवात झाली. अशाप्रकारे अनेक सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. कधी नव्हे ते कोरोनाच्या निमित्तानं लोक आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. इंग्लडमध्येही असाच एक सकारात्मक परिणाम समोर आला आहे.
2020 मध्ये धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. UCAL Smoking Toolkit Study या अभ्यासातील निष्कर्षाच्या आधारे कोरोना या जागतिक महासंकटामुळे धूम्रपान घटण्यास मदत झाली आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दुसऱ्या शब्दांत म्हणायचं तर कोरोनाची कृपा झाली आहे, असंही म्हटलं जात आहे.
ब्रिटनमधील आकडेवरीवर नजर टाकल्यास लक्षात येईल, धूम्रपान थांबावणाऱ्यांची संख्या 2019 मध्ये 14.2 टक्के होती ती ऑगस्ट 2020 मध्ये 23.2 टक्के झाली आहे. याला अनेक कारण असू शकतात एक म्हणजे लॉकडाउन असल्याने समाजात मिसळण्याचे प्रमाण कमी झालं आणि महत्त्वाचं म्हणजे लोक आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत.
हे वाचा-आजोबांनी तिला लग्नासाठी नटलेलं पाहावं यासाठी नातीनं केला 320 किमींचा प्रवास
जगात धूम्रपानाचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याच्या दुष्परिणांबद्दल जागृती केली जाते. त्यात इंग्लडमध्ये स्टोप्टोबर, फ्रान्समध्ये तंबाखुमुक्त महिना अशा अनेक मोहीम जगभर सुरू केल्या जाणार आहेत. ब्रिटनमधील धुम्रपान सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे या वर्षात जितक्या लोकांनी धूम्रपान सोडलं आहे ती संख्या दशकातील सर्वाधिक आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. युकेमध्ये दहा लाख जणांनी धुम्रपान सोडलं आहे. जागृती मोहिमांचा यात मोठा वाटा तर आहेच मात्र कोरोनाची भीती हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे.
कोरोनामुळे मात्र संपूर्ण जगभरात तंबाखू सेवान करण्याचं प्रमाण कमी झालं असं म्हणता येणार नाही. इंग्लंडमध्ये समोर आलेली आकडेवारी दिलासादायक आहे. राष्ट्रीय युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार अमेरिकेत 11 ते 18 या वयोगटातील व्यक्तींच्या धुम्रपानाच्या संख्येत 20 लाखांची घट झाली आहे. मात्र ही आकडेवारी कोरोनाच्या आधीची आहे. गेल्या वर्षी मोहिमेत 2 लाख लोकांनी सहभाग नोंदविला होता. इंग्लंडमध्ये ऑक्टोबर महिन्यात 28 दिवस तंबाखूपासून दूर राहण्याचं आवाहन स्टॉपटोबर या अभियानाद्वारे केलं जातं आणि हेच आवाहन फ्रान्समध्ये तंबाखूमुक्त महिना या अभियानातून केलं जातं. सिगारेटपासून परावृत्त करणे हा उद्देश आहे. कोरोनासारखं संकट असुदे किंवा नाही आलं तरी अशा मोहिमा सुरू राहायला हव्यात.
हे वाचा-'कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचा धक्कादायक खुलासा
कोरोनाने विशेषतः फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि सातत्याने धूम्रपान करणाऱ्यांची फुफ्फुसांची क्षमता कमी झालेली असते. अशा स्थितीत कोरोनाची लागण झाल्यास ते अधिक धोकादायक ठरू शकते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि ते टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे हा संदेश आणि याबाबतची जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी, अनेकांनी आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतल्याने धूम्रपान कमी झाले आहे. हळूहळू सोडण्याकडे लोकांचा कल वाढला आहे हेच ही आकडेवारी दर्शवते.