मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'Omicron इतर कुठल्याही वेरिएंटच्या तुलनेत प्रचंड वेगाने पसरतो आहे', WHO कडून खबरदारीचा इशारा

'Omicron इतर कुठल्याही वेरिएंटच्या तुलनेत प्रचंड वेगाने पसरतो आहे', WHO कडून खबरदारीचा इशारा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन हा अभूतपूर्व वेगाने पसरत असून, जगातील सर्व देशांनी या संसर्गापासून त्यांच्या आरोग्य व्यवस्थांच्या संरक्षणाची खबरदारी घ्यावी असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी (14 डिसेंबर 21) दिला.

जीनिव्हा, 15 डिसेंबर : कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन हा अभूतपूर्व वेगाने पसरत असून, जगातील सर्व देशांनी या संसर्गापासून त्यांच्या आरोग्य व्यवस्थांच्या संरक्षणाची खबरदारी घ्यावी असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंगळवारी (14 डिसेंबर 21) दिला. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधनॉम घेब्रेसस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ओमिक्रॉनच्या जगभरातील विस्ताराबद्दल माहिती दिली.

द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घेब्रेसस म्हणाले, ‘गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा हा मोठ्या प्रमाणात म्युटेशन झालेला वेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) पहिल्यांदा सापडला. त्यानंतर त्याचा प्रसार 77 देशांत झाला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे अनेक देशांत ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण सापडलेही नाही. ओमिक्रॉन विषाणू या आधीच्या कुठल्याही वेरिएंटच्या तुलनेत प्रचंड वेगाने पसरतो आहे. हा वेग अभूतपूर्व आहे.’

डब्ल्युएचओ एक्सपर्ट अबदी महमूद म्हणाले, ‘मॉडेलिंगच्या निष्कर्षांवरून लक्षात आलं आहे, की युरोपातील काही देश सध्या कोरोनाच्या पाचव्या लाटेचा सामना करत आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन या सगळ्यावर वरचढ झाल्याचं दिसतंय. आधीच्या विषाणूंच्या तुलनेत लशी (Vaccine) या वेरिएंटविरुद्ध कमी प्रमाणात सक्षम असल्याचं वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झालंय.’

फायझरने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्ती आधीच्या वेरिएंटविरुद्ध 93 टक्के कार्यक्षम ठरत होत्या त्या तुलनेत ओमिक्रॉनविरुद्ध 70 टक्केच कार्यरत ठरत आहेत. डेटातून असंही दिसून आलंय की ओमिक्रॉनची लक्षणंही तशी खूप प्रखरपणे दिसत नाहीत.

Explainer : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का?

डब्ल्युएचओ एक्सपर्ट ब्रुस एलवर्ड म्हणाले, ‘परिस्थिती सुधारल्यामुळे लोक एकत्र भेटण्याचे कार्यक्रम ठरवत आहेत. गेटटुगेदर प्लॅन करत आहेत. त्यातच ओमिक्रॉनचा फासरा धोका नाही असा गैरसमज करून घेतला तर आपण सगळ्यांनीच खूप मोठा धोका पत्करला असं होईल. परिस्थिती खूपच भयावह होईल. त्यामुळे मी खबरदारीचा इशारा देतो की काळजी घ्या.’

टेड्रोस यांनी इशारा दिला असून ते म्हणाले, ‘ओमिक्रॉन हा तसा माइल्ड (Omicron is mild) आहे आणि त्यामुळे माणूस गंभीर आजारी पडत नाही असा समज करून त्याकडे दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. त्याच्या प्रसाराचा वेग पाहता अशा आजारासाठी सज्ज नसलेल्या आरोग्य यंत्रणांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे लस घेणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं (Social Distancing) हे नियम पाळून आपण ओमिक्रॉनला रोखू शकतो आणि ते सर्व देशांनी करायलाच हवं. सातत्याने आणि व्यवस्थितपणे हे करायलाच हवं.’

दातदुखीमुळे झालं Omicron व्हेरिएंटचं निदान; पिंपरी चिंचवडमधील कुटुंबाला लागण

डब्ल्युएचओ इमर्जन्सीज डायरेक्टर मायकेल रायन म्हणाले, ‘ओमिक्रॉनचा कुठे किती प्रसार झाला आहे याचा डेटा त्या देशांनी व्यवस्थित नोंदवायला हवा. ओमिक्रॉनच्या प्रसाराचं गांभीर्य लक्षात घेऊन संसर्ग वाढला तर काय होऊ शकेल याचा अंदाज बांधून आरोग्य यंत्रणांनी सज्ज व्हायला हवं. जरी आताच्या केसेस खूप गंभीर नसल्या तरीही त्यांचा ताण आरोग्य यंत्रणांवर येणारच आहे त्यामुळे तो कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.’

ओमिक्रॉन व्हेरिएंट वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

ट्रेडोस म्हणाले, ‘काही देशांनी ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे. पण या वेरिएंटबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे लसीचे डोस आताच वापरले गेले तर ते भविष्यात कमी पडू शकतात. काही देशांमध्ये अजून नागरिकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. जर बूस्टर डोस दिले गेले तर श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये लशींचं असमान वाटप होईल आणि मग या वर्षीच्या सुरुवातीला झालेली लशीच्या कमतरतेची परिस्थितीही उद्भवू शकते.’

‘जगातल्या 41 देशांमध्ये अजून 10 टक्के नागरिकांना लसीचा डोस मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला लस वितरणातील असमानतेची चिंता आहे. श्रीमंत देशांनी बूस्टर डोस द्यावेत आम्ही त्याच्याविरुद्ध नाही पण आरोग्यवान नागरिकांना बूस्टर डोस देणं योग्य नाही. आम्ही बूस्टर डोस देण्याविरुद्ध नाही पण लस वितरणातील असमानतेला आम्ही विरोध करतो. जगातील प्रत्येक देशातील नागरिकांच्या जीवनाला समान महत्त्व हे त्यामुळे श्रीमंत देशांनी बूस्टर डोस देताना दक्षता घ्यावी,’ असा इशाराही टेड्रोस यांनी दिला.

First published:

Tags: Corona vaccination, Corona virus in india, Who