गुना, 31 ऑक्टोबर : 100 कोरोना संक्रमित रुग्णांवर गुना जिल्ह्यातील 9 डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपचार केले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत या डॉक्टरांनी निरीक्षण व टिप्स देत कोरोना रुग्णांना बरं केलं आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात घरात राहून 107 पैकी 100 कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुनाच्या या डॉक्टरांनी भोपाळमधील होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांवर उपचार केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 925 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यापैकी 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यात 107 कोरोना संसर्ग झालेले व होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते. त्यांनी दिवसातून दोन वेळा औषधांचा डोस दिला जात होता व व्हिडीओकॉलवर त्यांच्यावर उपचार केला जात होता. ज्यामुळे 100 रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते कामात रुजू झाले आहेत. अनेकांनी या डॉक्टरांचं आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.
हे ही वाचा-5 महिने कोरोनामुक्त रुग्णांभोवती सुरक्षा कवच; व्हायरस काहीच बिघडवू शकत नाही
रुग्ण फोनवर म्हणाले तुम्ही देव आहात
आरोग्य विभागाने कोविड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील डॉ.नीरज भदौरिया, डॉ.प्रमिला श्रीवास्तव, डॉ.कपिल रघुवंशी, डॉ.मोहन सिंह राजपूत, डॉ. कुलदीप बनावे, डॉ.अंकेश अग्रवाल, डॉ.आकंक्षा गुप्ता, डॉ.अरुणा रघुवंशी आणि डॉ.निकिता सोनी होम आइसोलेशनमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांवर व्हिडीओकॉलच्या माध्यमातून उपचार करीत होते. तर स्टाफ नर्स भारती राठोड, रीना धाकड, कीर्ती खत्री, संतोष वर्मा आणि द्रोपदी यांनीही उपचारासह अन्य आजाराची माहिती घरबसल्या दिली. अनेक रुग्णांनी या डॉक्टरांचे धन्यवाद मानले आहे. फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात (30 ऑक्टोबर) राज्यात 8,241 जणांनी कोरोनावर मात केली तर 6,190 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही 15,03,050 एवढी झालीय. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16,72,858 एवढी झाली आहे. राज्यात काल 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43,837वर गेला आहे. राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.