नवी दिल्ली, 14 जानेवारी: कोरोनाला (Coronavirus) हरवण्यासाठी देशामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणास (Vaccination program) सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 3 कोटी लोकांना व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. दरम्यान यापूर्वी नीती आयोगाने (NITI Aayog) स्पष्ट केलं आहे की लशीच्या केवळ आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. बाजारात विक्री करण्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या व्हॅक्सिनला बाजारात विक्रीसाठी मंजुरी तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार यास मान्यता देईल.
या लोकांना पहिल्यांदा मिळेल व्हॅक्सिन
सरकारने सीरम इंस्टीट्यूटच्या कोव्हिशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) च्या कोव्हॅक्सीनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. 16 जानेवारापासून लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. यावेळी फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यानंतर 50 वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिन दिलं जाईल. शिवाय पोलीस आणि सैनिकांना देखील व्हॅक्सिन देण्यात येणार आहे.
या किंमतीला मिळणार लस
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मोदी सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस 200 रुपयांना देणार आहे. तर बाजारात ही लस प्रति डोस 1000 रुपयांना उपबल्ध होईल. अर्थात बाजारात लस विक्री करण्याची परवानगी मिळाल्यानंंतरच अशाप्रकारे लस उपलब्ध होईल. सीरम इंस्टीट्यूटकडे सरकारने 1.1 कोटी कोरोना व्हॅक्सिनची ऑर्डर दिली आहे. भारत बायोटेकचे व्हॅक्सिन केंद्र सरकारला प्रति डोस 295 रुपयांने दिले जात आहे. केंद्राने 55 लाख व्हॅक्सिनची ऑर्डर दिली आहे. विशेष म्हणजे भारत बायोटेक सरकारडून केवळ 38.5 लाख व्हॅक्सिनचे शुल्क घेत आहे.