मुंबई, 04 जुलै : कोरोनाचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट तर केली जातेच. पण घरच्या घरीही निदान करण्यासाठी बऱ्याच टेस्ट किट्स उपलब्ध आहेत. कोरोनाची होम टेस्ट किट असो किंवा आरटी-पीसीआर टेस्ट ज्यात फक्त कोरोना झाला आहे की नाही हे समजतं. पण कोरोनाच्या नेमक्या कोणत्या व्हेरिएंट्सची लागण झाली आहे, हे ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेसिंग करावं लागतं. पण आता अशी कोरोना टेस्ट किट तयार करण्यात आली आहे, ज्यात काही तासातच कोरोनासोबतच व्हेरिएंट्सचंही निदान होणार आहे (Corona test kit).
अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी एक रॅपिड कोविड-19 टेस्ट (Rapid Covid-19 Test) विकसित केली आहे. या टेस्टच्या माध्यमातून अगदी काही तासांमध्ये सध्या SARS-Cov-2 या विषाणूच्या (Virus) अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंट्सची (Variant) माहिती मिळू शकणार आहे. या टेस्टला कोव्हर स्कॅन (CoVerScan) असं नाव देण्यात आलं आहे. या टेस्टच्या माध्यमातून SARS-Cov-2 या विषाणूच्या आठ हॉटस्पॉटविषयी माहिती मिळू शकते.
अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधल्या (यूटी) साउथ वेस्टर्न मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी 4 हजारांहून अधिक व्यक्तींचे नमुने जमा केले आणि त्यांची कोव्हर स्कॅनच्या मदतीनं टेस्ट केली. यात कोरोना संसर्ग झालेल्या आणि कोरोना संसर्ग नसलेल्या व्यक्तीही समाविष्ट होत्या. क्लिनिकल केमिस्ट्री या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधानातून, कोविड-19चं निदान आणि उपचारांसाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पद्धतींइतकी ही टेस्ट अचूक असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही SARS-Cov-2 च्या सद्यस्थितीत असलेल्या सर्व व्हॅरिएंट्समधला फरक यशस्वीपणे ओळखू शकते.
या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक जेफ्री सोरिल यांनी सांगितलं, या टेस्टचा वापर करून आपण रुग्णाला कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे आणि कोणता नवा व्हेरिएंट तयार होत आहे का, या बाबी तातडीनं जाणून घेऊ शकतो.
हे वाचा - Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू
कोरोनाचं निदान करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत खूप महागडी आहे, त्यासाठी अनेक उपकरणांची गरज असते. तसंच या चाचण्यांमधून SARS-CoV-2 चं जेनेटिक मटेरियल किंवा विषाणूच्या पृष्ठभागावर आढळणारे लहान रेणू शोधले जातात. कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे, हे जाणून घेणं अशक्य असतं. तसंच, या टेस्ट काही व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी पुरेशा नाहीत, असं काही संशोधकांचं मत आहे. अशात कोरोनासोबत कोरोनाच्या व्हेरिएंट्सचंही निदान करणारी ही नवी टेस्ट निश्चितच फायदेशीर ठरेल असं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle