तेजिंदरसिंग सोढी
नवी दिल्ली, 2 मे : 6 दिवस होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) राहिल्यानंतर अखेर माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative) आला. माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी तो दिलासादायक क्षण होता. माझ्या कुटुंबाला या सहा दिवसांत बऱ्याच गोष्टींतून जावं लागलं. प्रत्येक जण माझ्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत होता. माझ्या 22 महिन्यांच्या मुलीला तर हे कळण्याची शक्यताच नव्हती, की तिचे बाबा घरात असूनही तिला जवळ का घेत नाहीयेत किंवा तिच्याशी खेळत का नाहीयेत. सगळ्या 6 दिवशी सकाळी ती मला प्रत्येक खोलीत शोधायची. शेवटी ती पायऱ्यांपाशी येऊन हाका मारायची. त्यामुळे माझ्या काळजात कालवाकालव व्हायची. कारण मी तिला प्रतिसाद देऊ शकत नव्हतो. मी आयसोलेशनमध्ये असलेल्या खोलीत येण्याचा ती प्रयत्न करेल, म्हणून मी तिला प्रतिसाद देत नव्हतो.
मी माझी ही गोष्ट का लिहितोय, तर त्यात एक छोटासा संदेश आहे. माझ्याबरोबरच्या चौघांना कोरोना संसर्गाने (Corona Infection)गाठलं; मात्र मी त्याच्यापासून बचावलो. तसं का झालं, याबद्दल मी लिहितो आहे.
वाचा - RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय? कोरोना रिपोर्टवर याचा काय परिणाम होतो?
गेल्या वर्षी कोरोनाचं आगमन झाल्यापासून मी बाहेर पडताना चेहरा झाकूनच (फेस शिल्ड) घराबाहेर पडायचो. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मी डबल मास्किंग (Double Masking) म्हणजेच दोन मास्कचा वापर सुरू केला. मी सर्जिकल मास्क (Surgical Mask) घालायचो आणि त्यावर N-95 मास्क घालायचो. माझ्या पगडीमुळे मला अधिक काळजी घ्यावी लागायची. कारण मास्क सैल झाले किंवा मी ते काढले,तर ते पुन्हा बसवण्यात फार वेळ जायचा. म्हणूनच बऱ्याचदा मी बाहेर असताना मास्क काढायचोच नाही.
गेल्या आठवड्यात एका सकाळी जम्मू शहरालगतच्या भागात ऑक्सिजन जनरेशन (Oxygen Generation) प्लांट संदर्भात एक बातमी करण्यासाठी मी गेलो होतो. तिथे अन्य माध्यमांमधल्या काही पत्रकारांशी भेट झाली. तो दिवस उष्ण आणि आर्द्र होता. आपापल्या ऑफिसला बातमी पाठवल्यानंतर आम्ही पाच जण एका छोट्या जागेत एकत्र बसलो. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पोटॅटो चिप्सची ऑर्डर आम्ही दिली.
मग माझ्या लक्षात आलं, की मी खाण्या-पिण्यासाठी मास्क काढला, तर मला तो पुन्हा लावणं अवघड होईल. म्हणून मी तो निर्णय बदलला. बाकीच्यांनी मलाही पेय पिण्याचा आग्रह केला; पण मी त्यांना नकार दिला. आम्ही सगळे थोडा वेळ तसेच बसलो आणि मग जम्मूला परतलो.
त्यादिवशी नंतर उशिरा मला एका सहकाऱ्याचा फोन आला, की सकाळच्या त्या पत्रकारांपैकी एकाला नंतर ताप आला आहे. त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली.
मी काळजीत पडलो आणि माझ्या डॉक्टरना फोन लावला, त्यांनी मला तातडीने विलगीकरणात राहायला सांगितलं आणि चार दिवसांनी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी चार दिवसांनी टेस्ट केली. दरम्यानच्या काळात त्या दिवशीचे माझे सगळे पत्रकार मित्र कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्याचं कळलं. त्यामुळे मी अधिक काळजीने माझ्या रिपोर्टची वाट पाहत होतो. त्यात भरीस भर म्हणून त्या लॅबने माझं टेस्ट सॅम्पल हरवल्याचं सांगितलं. त्यामुळे शुक्रवारी मी पुन्हा टेस्टसाठी सॅम्पल दिलं.
Doctor Suicide : रुग्णांना मरताना पाहून कोरोना योद्धा डॉक्टरनेही संपवलं आयुष्य
अखेर जेव्हा माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं कळलं, तेव्हा मी सुस्कारा सोडला. मला असं वाटतं, की माझ्या मास्कनीच मला वाचवलं. टेस्ट रिपोर्ट वाचल्यानंतर मी पहिली गोष्ट काय केली असेल, तर माझ्या मुलीला उचलून घेऊन मिठी मारली. त्याक्षणी माझ्या भावना आणि मुलीच्या प्रतिक्रिया काय होत्या, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. त्यामुळेच नियमितपणे मास्क वापरा आणि जीव वाचवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mask