नवी दिल्ली, 23 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं (Corona Second Wave) देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. त्याचबरोबर आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात तरुण वर्गाला जास्त फटका बसल्याचं दिसून येत आहे. आकडेवारीनुसार यावेळी 45 वयापेक्षा कमी असलेल्या लोकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी, आयसीयू (ICU) विभागामध्ये दाखल होण्याचे तरुणांचे प्रमाण वाढले आहे. ज्या राज्यांमध्ये जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत, तिथेच ही परिस्थिती होती, असा काही भाग नव्हता तर सर्वत्रच अशी परिस्थिती होती. जवळपास सर्वच राज्यांमध्ये 50 पेक्षा कमी वय असलेल्यांची मृतांची संख्या जास्त नोंदली गेली आहे. तरुणांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलं आहे, असं विविध रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणे आहे.
यावेळी तरुण आणि वृद्ध रुग्ण संख्येचे प्रमाण जवळपास सारखेच होते. 60 ते 70 टक्के रुग्ण हे साठ वर्षांपेक्षा खालचे होते, त्यातही अर्ध्याहून अधिक 45 वयाच्या खालचे रुग्ण होते. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर जवळपास वीस टक्के होता, असे गुडगावच्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रेश्मा तिवारी यांनी सांगितले. तर तामिळनाडूच्या आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार कोणतेही गंभीर आजार नसलेल्याही तरुणांचा कोरनामुळं मृत्यू झालाय.
तज्ज्ञांनी सांगितली ही तीन कारणं..
देशभरातील तज्ञ डॉक्टरांनी याबाबत तीन कारणं सांगितली आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे हायपोक्सिया. यामुळं तरुणांच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल मोठ्या प्रमाणात कमी होते आणि त्यानंतरच त्यांना श्वास घ्यायला त्रास होण्यास सुरू होते. तोपर्यंत शरीरात मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला असतो आणि त्यानंतर ताबडतोब उपचार मिळाले नाही तर परिस्थिती फारच खालावते आणि रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. याबाबत उदाहरण द्यायचे झाल्यास पाटणामध्ये पारस रुग्णालयांमध्ये सापडलेले हायपोक्सिया चे 47 रुग्ण 30 ते 35 वयोगटातील होते.
हे वाचा - काही दिवसातच थाटणार होता संसार मात्र कोरोनानं केला घात, पिंपरीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
45 पेक्षा कमी वय असलेला तरुण वर्ग कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी घराबाहेर पडत असतो. त्यांचे आत्तापर्यंत लसीकरण देखील झालेले नाही. 45 वयापेक्षा अधिक वय असलेल्यांना अलीकडे लसीकरण सुरू झाले आहे आणि त्यातच लसीचा तुटवडाही जाणवत आहे. तरुण वर्गातील मध्यम वयस्क लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याचे दिसून आले आहे. आणि त्यांना लस ही मिळालेली नसल्यामुळं अडचणी वाढल्या आहेत, असे ओडिशाचे डॉक्टर जयंत पांडा यांनी सांगितलं.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळीची लाट अधिक घातक आहे. संसर्गाचे प्रमाण यावेळी मोठे असून मृतांची संख्याही अधिक वाढल्याने तरुणांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, असे गुडगावचे चिकित्सक डॉक्टर सुशील कटारिया यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Coronavirus