नवी दिल्ली, 07 जानेवारी : भारतातील कोरोनाची (coronavirus in india) परिस्थिती आता कुठे सुधारू लागली असताना नव्या कोरोनाचं संकट आ वासून उभं राहिलं आहे. मोदी सरकारसमोर आता कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनला रोखण्याचंही आव्हान आहे. त्यामुळे देशात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं असलेल्या महाराष्ट्राला (maharashtra coronavirus) केंद्र सरकारनं सावध केलं आहे. कोरोनाबाबत हलगर्जीपणा नको आता कठोर राहा, असे आदेश मोदी सरकारनं उद्धव ठाकरेंना दिले आहेत.
देशात ज्या राज्यांमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत, ज्या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र दिलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांचा समावेश आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी तब्बल 59% प्रकरणं फक्त या चार राज्यांमध्ये आहेत.
कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत आपण जे प्रयत्न केलं आणि त्यातून जे काही आपण साध्य केलं, मिळवलं ते राज्यांनी दिलेली कोणतीही शिथीलता, सूट किंवा राज्यांचा हलगर्जीपणा यामुळे पाण्यात जाऊ शकतं. त्यामुळे सध्या कोरोना प्रकरणांचा उद्रेक पाहता कठोर राहण्याच्या आणि आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेश केंद्रीय सचिवांनी या राज्यांना दिले आहेत.
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1,03,95,278 झाली आहे. त्यापैकी 1,00,16,859 रुग्ण बरे झालेल आहेत. 150336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 228083 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यूकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचीही 73 प्रकरणं आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 8 रुग्ण आहेत. मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील गुरुवारची आकडेवारी पाहता एकूण 19,58,282 कोरोना रुग्ण आहेत. 18,56,109 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.78% आहे. मृत रुग्णांची संख्या 49897 झाली आहे. मृत्यू दर 2.55% आहे. दिवसभरात 3,729 नवे रुग्ण आढळले आहेत तर 3,350 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता एकूण 51,111 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.