मेड इन इंडिया कोरोना लस घेतल्यानंतर कसं वाटतंय? तरुणाने मांडला आपला अनुभव

मेड इन इंडिया कोरोना लस घेतल्यानंतर कसं वाटतंय? तरुणाने मांडला आपला अनुभव

कोवॅक्सिन (COVAXIN) लशीच्या परिणामांबाबत आतापर्यंत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र ज्यांना ही लस दिली जाते आहे, त्या व्यक्तींवर या लशीचा काय परिणाम होतो आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 ने केला.

  • Share this:

रोहतक, 28 जुलै : भारताने तयार केलेली कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनची (COVAXIN) मानवी चाचणी (HUMAN TRIAL) देशभरात सुरू झाली आहे. ही लस दिल्यानंतर त्याचे सुरुवातीला काहीच दुष्परिणाम दिसून आले नाहीत, असं नुकतंच दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाने सांगितलं. दरम्यान ज्या लोकांना ही लस देण्यात आली त्यांना नेमकं काय वाटतं आहे? त्यांच्यावर या लशीचा परिणाम कसा होतो आहे? याबाबत न्यूज 18 ने जाणून घेतलं आहे.

रोहतक पीजीआयमध्ये कोवॅक्सिन लशीचं ह्युमन ट्रायल सुरू आहे. या ठिकाणी सर्वात आधी कोरोना लस घेणाऱ्या तरुणाने न्यूज 18 वर आपला अनुभव मांडला आहे. हा तरुण रोहतकचा राहणारा आहे. मेडिकल एथिकल कमिटीच्या गाइडलाइन्सनुसार News 18 त्याची ओळख सांगू शकत नाही.

कोवॅक्सिन घेणारा हा तरुण म्हणाला, "कोरोना लशीचं क्लिनिकल ट्रायल करण्यापूर्वी माझी आरोग्य तपासणी करण्यात आली. मला कोणता आजार नाही ना याची पडताळणी करण्यात आली. 17 जुलैला मला कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. वैद्यकीय परीक्षणानंतर मला डॉक्टारंच्या देखरेखीत ठेवण्यात आलं. एक आठवडाभर दररोज तीन ते चार वेळा माझ्या आरोग्याची माहिती घेतली गेली. मला कोणत्या प्रकारची समस्या जाणवली नाही. आता मला 31 जुलैची प्रतीक्षा आहे, जेव्हा मला दुसरा डोस दिला जाईल"

हे वाचा - Corona Warriors : कोरोनाला हरवून आता कोरोना रुग्णांना पुरवतोय 'ऑक्सिजन'

"जसे सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची चिंता करत नाहीत, तसंच योगदान मी माझ्या देशासाठी दिलं आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढतं आहे. कोरोनावरील औषध लवकरात लवकर तयार होईल, या आशेवर सर्वजण आहेत. कोवॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय मी देशसेवा समजून घेतला आहे.  आपला देश कोरोनाची लस तयार करण्यात यशस्वी झाला तर मला अभिमान वाटेल इतर लोकांनाहीदेखील क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होऊन देशसेवा करावी", असं आवाहन या तरुणाने केलं आहे.

या तरुणाने याआधी रक्तदानही केलं आहे. आतापर्यंत त्याने 27 वेळा आपलं रक्त दान केलं. त्याचं कुटुंबदेखील त्याला या कार्यासाठी पाठिंबा देतं. आपल्या देशातील डॉक्टरांवर आपला विश्वास आहे. कोवॅक्सिनची चाचणी यशस्वी होईल आणि आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू असा विश्वास या तरुणाने व्यक्त केला आहे.

हे वाचा - GOOD NEWS कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल शेवटच्या टप्प्यात ; 30000 जणांवर चाचणी सुरू

हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनी, इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार केली आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करून परवानगी मिळाली. देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटल्समध्ये या लशीची चाचणी केली जाते आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एकूण 375 जणांना ही लस दिली जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: July 28, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या