मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Explainer : जाणून घ्या लस घेतल्यावर सुद्धा का होतोय Corona

Explainer : जाणून घ्या लस घेतल्यावर सुद्धा का होतोय Corona

नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) ही व्यक्तीला कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरु शकते. तथापि गेल्या काही दिवसांमध्ये, असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. अशा केसेसला ‘ब्रेकथ्रू संक्रमण’ (Break Through Infections) असं म्हणतात म्हणजे लस घेतल्यामुळे व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या संरक्षण करणाऱ्या प्रतिकारशक्तीला भेदून ती व्यक्ती संक्रमित झाली म्हणून असा संसर्ग झालेल्या रुग्णाला ब्रेकथ्रू केस असंही म्हणतात. ब्रेकथ्रू संसर्गाच्या फार कमी केसेस नोंदल्या गेल्या आहे. परंतु, यामुळे या लसींच्या परिणामकतेवर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती लसीचा डोस घेण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात लसी घेतल्यानंतर होणाऱ्या संसर्गाचं म्हणजे ब्रेकथ्रु संसर्गाचं प्रमाण हे अत्यंत कमी म्हणजेच 0.05 टक्के आहे.

भारतातील ब्रेकथ्रु केसेस

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ब्रेकथ्रू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसींच्या परिणामकतेविषयी शंका दूर करण्यासाठी आयसीएमआरने गेल्या आठवड्यात भारतीय लस मिळालेल्या लोकसंख्येचा डेटा जाहीर केला. त्यामध्ये 10000 लसीकरण झालेल्या लोकांच्या गटापैकी सुमारे 2 ते 4 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

आतापर्यंत 11.6 कोटी नागरिकांना कोव्हिशिल्ड (Covishield) लसीचा डोस देण्यात आला. त्यापैकी 10.03 कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, आणि त्यातील 17,145 लोकांना संसर्ग झाला. याचाच अर्थ 0.02 टक्के लोकांवर अशा प्रकारे परिणाम दिसून आला. 1.57 कोटी लोकांपैकी ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला त्यापैकी 5,014 म्हणजेच 0.03 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.

आतापर्यंत 1.1 कोटी लोकांनी कोव्हॅक्सिन (Covaccine) लसीचा डोस घेतला आहे. त्यापैकी 93.56 लाख लोकांनी या लसीचा पहिला डोस घेतला,त्यातील 4208 जणांना कोरोना संसर्ग झाला. हे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत 0.04 टक्के आहे. 17.37 लाख लोकांनी या लसीचा दुसरा डोसही घेतला. त्यापैकी 695 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. हे प्रमाण 0.04 टक्के आहे.

वाचा: अरे चाललंय तरी काय? अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू; पंकजा मुंडेंनी केली 'ही' मागणी

आपण पाहिल्यास हे प्रमाण खूपच कमी आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर किती दिवसात किती जणांना संसर्ग झाला, हे मात्र समजू शकलेले नाही. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, लसीकरणात आरोग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर्स (Frontline Workers) यांना प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु, त्यांना दीर्घकाळ करावे लागत असलेले काम आणि श्रमामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच वेगाने संसर्ग पसरवणारा नवा म्युटंट स्ट्रेन (Mutant Strain) हा ब्रेकथ्रू संसर्गाला पूरक ठरत आहे.

या लसी संसर्गाला अटकाव करु शकत नाहीत तर संसर्ग झाल्यानंतर रुग्णाची स्थिती गंभीर होण्यापासून किंवा हॉस्पिटलायझेशन पासून संरक्षण करतात. बहुतेक ब्रेकथ्रु इन्फेक्शन्स किंवा संसर्ग हे सौम्य असतात, असं मत पुण्यातील केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड लसीच्या चाचणीचे मुख्य अन्वेषक डॉ. आशिष बावडेकर यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र राज्य कोविड-19 टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी निदर्शानास आणून दिले की सध्या वापरल्या जाणाऱ्या प्रारंभिक पिढीतील लसी या केवळ आपत्कालीन वापरासाठीच आहेत. पारंपारिक लसींच्या वेळापत्रकानुसार, लस विकसित होण्यास अनेक वर्षे लागतात. परंतु या प्रारंभिक पिढीतील जलदगती असलेल्या लसी आहेत. या लसींच्या परिणामकतेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला अधिक डेटा आणि मजबूत फार्माव्हिगीलन्सची आवश्यकता आहे. उत्तम आणि अधिक प्रभावी लस निर्मिती झाल्यानंतर ब्रेकथ्रू संसर्गाचे प्रमाण कमी होईल.

जागतिकस्तरावरील ब्रेकथ्रू केसेस

या आठवड्यात प्रसिध्द झालेल्या सीडीसी डेटानुसार, अमेरिकेत (America) 87 दशलक्ष नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, 7157 नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून आला आहे. याबाबत सीडीसीने सांगितले की ब्रेकथ्रू इन्फेक्शन अपेक्षित आहे. मात्र ते चिंताजनक आकड्यांवर पोहोचलेले नाही. कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा लसीपासून स्वतःचा बचाव करण्याचा मार्ग शोधू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये 21 एप्रिलला प्रसिध्द झालेल्या अमेरिकेच्या एका नव्या अभ्यासानुसार, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाचा सामना करावा लागण्याचा धोका कमी होतो. त्यांच्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या 2 दुर्मिळ केसेस आढळून आल्या. या दोन रुग्णांपैकी एकाने फायझरची (pfizer) तर एकाने मॉडर्नाची (Moderna) लस घेतली होती. लसीनंतर हे एक महिलेसह हे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले परंतु ते रिकव्हर देखील वेगात झाले.

मॉल्क्युलर न्यूरो-ऑन्कोलॉजीच्या हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट लॅबोरेटरीचे अन्वेषक रॉबर्ट बी डार्नेल म्हणाले, की या रुग्णांचे लसीकरण झाले होते. त्यांच्यात रोगप्रतिकार प्रक्रियांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे त्यांना झालेले क्लिनिकल इन्फेक्शन (Clinical Infection) फारसा परिणाम करु शकले नाही.

पूर्ण संरक्षण मिळणे अशक्य

कोणतीही लस कोणत्याही रोगापासून बचाव करण्यासाठी 100 टक्के संरक्षण देऊ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ असा की कोरोना प्रतिबंधक लसीसह अन्य लसींमध्येही ब्रेकथ्रूच्या केसेस दिसून येतात. अमेरिकेतील रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्राच्या म्हणण्यानुसार, लसीकरण झालेले लोक आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते. परंतु, ते आजारी पडू शकतात हे नाकारले जाऊ शकत नाही. चाचणी दरम्यान कोरोना प्रतिबंधक विविध लसी या 60 ते 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक वापराच्या परिस्थितीत आणि चाचण्यांच्या नोंदवलेल्या अहवालापेक्षा लस सामान्यतः कमी प्रभावी असते. त्यामुळे लसीकरण झालेल्या व्यक्तीलाही संसर्ग होतोय, या आश्चर्यकारक असे काहीच नाही. तसेच लसीकरणानंतर शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास साधारणतः 2 आठवड्यांचा कालावधी लागतो. या कालावधीत एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता जास्त-कमी असू शकते. मात्र ज्यांनी लस घेतलेली नाही अशा व्यक्ती मात्र आजारी पडू शकतात. सध्या कोरोनाची नवे रुपे दिसून येत आहेत. यात ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्यात त्यांनी लस घेतली तर त्यांचा बचाव होण्याची शक्यता अधिक असते.

साथीच्या आजाराची व्याप्ती पाहता, सध्या जगात मोठ्या प्रमाणात विषाणू आहे आणि तो म्युटेट आणि विकसित होऊन अधिक वेगाने पसरु शकतो. पुढील महिने किंवा वर्षांमध्ये लस विकासकांसाठी हे एक आव्हान असणार आहे, असे मॉल्क्युलर न्यूरो-ऑन्कोलॉजीच्या हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट लॅबोरेटरीचे अन्वेषक रॉबर्ट बी डार्नेल यांनी स्पष्ट केले.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus