मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोमामध्ये असताना दिला बाळाला जन्म, कोरोनाला हरवून 3 महिन्यांनी पहिल्यांदा चिमुरडीला घेतलं कुशीत

कोमामध्ये असताना दिला बाळाला जन्म, कोरोनाला हरवून 3 महिन्यांनी पहिल्यांदा चिमुरडीला घेतलं कुशीत

Woman with her baby

Woman with her baby

केल्सी टाउनसेंडने तिच्या चौथ्या मुलाला जन्म दिल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनंतर ही 32 वर्षीय विस्कॉन्सिन महिला अखेर तिच्याशी समोरासमोर आली.

विस्कॉन्सिन, 04 फेब्रुवारी: कोव्हिड 19 च्या साथीनं (Covid 19 Pandemic) लोकांसमोर अनेक आव्हानं उभी केली. पण प्रेमाच्या, आत्मविश्वासाच्या बळावर अनेकांनी यावर मात केली. याचंच एक उदाहरण आहे विस्कॉन्सिनमधील (Wisconsin) केल्सी टाउनसेंड या आईचं आणि तान्ह्या बाळाचं. कोव्हिड 19ची लागण झालेली असताना केल्सीनं एका बाळाला जन्म दिला; पण तिची प्रकृती गंभीर झाल्यानं तब्बल तीन महिने तिला लाईफ सपोर्ट यंत्रणेवर राहावं लागलं, अखेर मृत्यूशी यशस्वी झुंज देत ही आई जिंकली आणि आपल्या बाळाला तिनं कुशीत घेतलं.

अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील केल्सी टाउनसेंड या 32 वर्षीय माहिलेनं 4 नोव्हेंबर रोजी आपल्या चौथ्या अपत्याला जन्म दिला; मात्र आपल्या या मुलीचा जन्म होताच तिला कुशीत घेण्याचं भाग्य तिला लाभलं नाही, कारण केल्सीला कोव्हिड 19ची लागण झाली होती. तीन महिन्यांनी केल्सीनं आपल्या या इवल्याशा मुलीला ल्युसीला पहिल्यांदा बघितलं. चमकदार डोळ्यांची लुसी आईच्या कुशीत जाताच हसू लागली. केल्सीनं तिला सांगितलं, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझी खूप आठवण येत होती.’  हे  अतिशय सुंदर असं हे दृश्य होतं.

(हे वाचा-कोरोना म्हणजे काय? दोनदा पॉझिटिव्ह झालेल्या तरुणाला महासाथीची माहितीच नाही)

गरोदर असतानाच केल्सीला कोव्हिड 19 ची लागण झाल्यानं तिला मॅडिसन (Madison) येथील एसएसएम हेल्थ सेंट मेरी  हॉस्पिटलमध्ये (SSM Health St. Mary Hospital) दाखल करण्यात आलं होतं. ती कोमात (medically-induced coma) असताना तिचं सीझर करण्यात आलं आहे आणि 04 नोव्हेंबर रोजी लुसीचा जन्म झाला. medically-induced coma या प्रक्रियेमध्ये मेंदूला दुखापत होऊ नये म्हणून संबंधित रुग्णाला डॉक्टरांकडून कोमा स्टेटमध्ये ठेवलं जातं. यामध्ये डॉक्टरांकडून काही औषध दिलं जातं ज्यानंतर कोणत्याही संवेदना होत नाहीत. योग्य खबरदारी घेऊनच मेडिकल इंड्यूस्ड कोमाची प्रक्रिया पूर्ण केली जाते

त्यानंतर केल्सी तब्बल 75 दिवस लाईफ आणि लंग सपोर्ट यंत्रणेवर (Life and Lung Support System) होती. त्यातून बाहेर आल्यावर अखेर 27 जानेवारी रोजी तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर तिनं पहिल्यांदा आपल्या बाळाला लुसीला जवळ घेतलं. या क्षणाचं वर्णन करताना केल्सी म्हणाली, ‘तब्बल तीन महिन्यांनी मी आणि माझं बाळ भेटलो तेव्हा आम्ही इतके दिवस वेगळे होतो, हे जाणवलेच नाही. लुसीनं मला बघताक्षणी जणू मी कोण आहे ओळखल्यासारखं मोठं स्माइल दिलं. ते बघून मला इतका आनंद झाला की मी शब्दात सांगू शकत नाही.’

(हे वाचा-कोरोना काळात प्रिय व्यक्तीला गमावलं आहे? इथे करता येईल स्मृतींचं जतन)

विस्कॉन्सिनमधील एसएसएम हॉस्पिटलमधील महिला आणि नवजात बालक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. जेनिफर क्रूप म्हणाल्या की,  कोव्हिड 19 मुळे आजारी असलेल्या एका आईची यशस्वी प्रसूती करून तिची आणि तिच्या बाळाची भेट घडवून आणणं ही फार दुर्मीळ घटना आहे.

‘केल्सी टाउनसेंड हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी एकदम कमी झाली होती.  त्यामुळे गर्भाचा मेंदू आणि इतर अवयवांचं नुकसान होण्याचा धोका वाढला होता. तिची त्वचा काळीनिळी झाली होती, त्यामुळं बाळाला वाचवण्यासाठी केल्सीची ताबडतोब प्रसूती करणं आवश्यक होतं, असं डॉक्टर थॉमस लिटलफिल्ड यांनी सांगितलं.

डिसेंबरच्या शेवटी केल्सी टाउनसेंडला दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणाची (Double Lung Transplantation) आवश्यकता भासते की काय असं डॉक्टरांना वाटत होतं; पण तिची प्रकृती हळूहळू सुधारली. थोड्याच दिवसात तिला अतिदक्षता विभागातुन बाहेर आणण्यात आलं, जानेवारीच्या मध्यात व्हेंटिलेटरही काढून टाकण्यात आला. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतूनही केल्सीचे नाव काढून टाकण्यात आलं. केल्सी टाउनसेंडचे पती डेरेक टाउनसेंड यांनी या अनुभवाचं वर्णन ‘बिग रोलर कोस्टर’ असं केलं आहे.

" isDesktop="true" id="518765" >

‘अनेक रात्री, रात्री उशिरा आणि पहाटे मला फोन येत असत आणि डॉक्टर मला सांगत असत की त्यांनी केल्सीला वाचवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व केलं आहे; मात्र तिची प्रकृती स्थिर ठेवणं कठीण जात आहे. त्यामुळं बर्‍याच वेळा असं वाटलं की आपण तिला गमावणार आहोत.’ असं डेरेक टाउनसेंड यांनी सांगितलं. ‘या तीन महिन्यांत लुसीला सांभाळताना हे जाणवलं की तिलासुद्धा आई घरी, आपल्याजवळ नाही आहे, याची जाणीव होत असावी. ती सतत काहीतरी शोधत असल्यासारखी आपलं डोकं सगळीकडे वळवून पहात असे. केल्सीलाही मी हे सांगितलं. लुसी सतत तुझाच शोध घेत असते,’ अशा शब्दात डेरेक टाउनसेंड यांनी या अनुभवाचं वर्णन केलं.

(हे वाचा-Sputnik V किती प्रभावी आणि सुरक्षित? तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जारी)

सावधगिरी बाळगूनही डेरेक आणि केल्सी यांना कोव्हिड-19 ची लागण झाली. डेरेक यातून लवकर बरा झाला मात्र केल्सीची प्रकृती बिघडत गेली. हॉस्पिटलमध्येही केल्सीची प्रकृती गंभीर होती. ‘माझं कुटुंबच माझ्यासाठी सर्वकाही आहे. जगण्यासाठी माझ्यासाठी हेच सर्वस्व आहे त्यामुळं मी घरी परत न येण्याचा सवालच नव्हता,’ असा विश्वास केल्सीनं या घटनेबाबत बोलताना व्यक्त केला.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19, United States of America