जमशेदपूर, 23 मे : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) देशभरात दिवसाला हजारो रुग्ण सापडत आहेत. दुसऱ्या बाजूला लसीकरणही सुरू आहे. अशा स्थितीत असंही एक गाव आहे येथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. जाणून घेऊ आत्तापर्यंत इथल्या लोकांनी कोणती काळजी घेतली आणि ते या महामारीपासून कसे सुरक्षित राहिले.
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये मागील आठवड्यात दररोज एक हजाराहून अधिक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळत होते. येथे दररोज दहा ते पंधरा लोकांचा या संसर्गामुळं मृत्यू होत होता. मात्र, आता येथील संक्रमण नियंत्रणात येऊ लागले आहे. दरम्यान, जमशेदपूरमधील हरलुंग गावात आत्तापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. येथील लोक कोरोना आणि स्वतःच्या आरोग्याबाबत अतिशय जागरूक आहेत. त्यामुळे येथे या महामारीला शिरकाव करता आलेला नाही.
या गावातले लोक स्वतःही गावाच्या बाहेर जात नाहीत आणि कोणाला गावात बाहेरून येऊ देत नाहीत. तसंच बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला पंचायत भवनात 14 दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गावातील एकच व्यक्ती गावाबाहेर जाऊन आवश्यक साहित्य घेऊन येतो, इतर लोक विनाकारण फिरणे, गावाबाहेर पडणे यापासून दूर राहतात. थोडासा सर्दी खोकला झाल्यास घरगुती उपचार करून बरे होतात. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते.
हे वाचा - लॉकडाऊनचे साईड इफेक्ट: आता पती-पत्नींच्या नात्यावर होतायेत परिणाम, बेरोजगारीमुळं घरातील वाद वाढले
इतक्या काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन करणाऱ्या येथील गावकऱ्यांच्या काही तक्रारीही आहेत. पंचायत किंवा जिल्हा परिषद प्रशासन घरोघरी जाऊन कोरोना महामारीविषयी काहीही माहिती देत नाहीत. ज्यांचे घर पंचायतीपासून जवळ आहे, त्यांची पंचायत भवनात कधीकधी कोरोना चाचणी केली जाते, असे सांगितले. शिवाय कोरोनावरील लसीविषयीही लोकांच्या मनात संभ्रम आहे. काही 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 18 वर्षांहून अधिक वय असलेले इतर लोकांनी काय करावे? या विवंचनेत आहेत. येथील लोकांना अद्याप ऑनलाइन बुकिंगची माहिती मिळालेली नाही, असे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus