Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना काळात भारतीयांना जडलं 'या' गोष्टीचं व्यसन, तुम्हीही आहात का शिकार?

कोरोना काळात भारतीयांना जडलं 'या' गोष्टीचं व्यसन, तुम्हीही आहात का शिकार?

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) सर्वांच्या जीवनशैलीत (Life style) आमूलाग्र बदल झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू केले जात असल्याने दैनंदिन व्यवहार, कामकाजावर परिणाम झाला आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) सर्वांच्या जीवनशैलीत (Life style) आमूलाग्र बदल झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू केले जात असल्याने दैनंदिन व्यवहार, कामकाजावर परिणाम झाला आहे. थेट देवाणघेवाण किंवा संपर्काऐवजी डिजिटल (Digital) माध्यमाचा वापर प्राधान्याने केला जात असल्याचं चित्र आहे; मात्र या गोष्टीचा नागरिकांवर परिणाम होताना दिसत आहे. सातत्याने ऑनलाइन राहण्याची सवय आता सर्वांनाच लागली आहे. ही सवय घातक ठरू पाहत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे. जगभरात याबद्दलचं सर्वेक्षण आणि संशोधन करण्यात आलं होतं. त्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तीनपैकी दोन भारतीयांनी या महामारीमुळे आपल्याला सतत ऑनलाइन (Online) राहण्याची सवय जडली असल्याचं स्पष्ट केलं आहे. नॉर्टन लाइफ लॉक या सायबर सिक्युरिटी कंपनीने (Norton Life Lock) हे संशोधन केलं आहे. नॉर्टन लाइफ लॉक कंपनीने घरी असलेल्या ग्राहकांच्या ऑनलाइन वर्तनाचं (Online Behavior) विश्लेषण करण्यासाठी नुकतंच जागतिक पातळीवर संशोधन केलं. 'द हॅरिस पोल'द्वारे करण्यात आलेल्या या ऑनलाइन अभ्यासात एक हजाराहून अधिक भारतीय सहभागी झाले होते. त्यात प्रत्येकी 10 पैकी 8 म्हणजेच 82 टक्के नागरिकांनी सांगितलं, की शिक्षण किंवा अन्य व्यावसायिक कामांसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर (Digital Screen) बसावं लागत आहे. महामारीच्या कालावधीत हा वेळ वाढला आहे. भारतातली प्रौढ व्यक्ती सध्या व्यावसायिक किंवा शैक्षणिक कामांसाठी दिवसाचे सरासरी 4-4 तास डिजिटल स्क्रीनसमोर घालवते. स्मार्टफोन हे आता सामान्य उपकरण झालं असून, स्मार्टफोनच्या वापरात आम्ही बहुतांश (84 टक्के) वेळ घालवतो, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीयांनी सांगितलं. अनेक कामं ऑफलाइन करता येऊ शकतात. परंतु, कोरोनामुळे ही कामं ऑनलाइन करावी लागत असल्याने डिजिटल स्क्रीनवरचं अवलंबत्व वाढलं आहे. आपल्या आणि मुलांच्या आरोग्यावर (Health) विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रत्येकाने ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन वेळ यामध्ये संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. ऑनलाइन माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीत (Cyber crime) मोठी वाढ झाल्याचं, नॉर्टन लाइफ लॉकचे भारत आणि सार्क देशांमधले विपणन संचालक रितेश चोपडा यांनी सांगितलं. डिजिटली कनेक्टेड उपकरणांचा वापर आपण कुठे आणि कसा करतोय, याबाबतची खबरदारी युझर्सनी घेणं गरजेचं आहे. सुविधा ही सुरक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची नाही. वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती चोरीला गेल्यास त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने ही बाब लक्षात घेऊन आपल्या मुलांना सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याचं चोपडा यांनी सांगितलं. नॉर्टन लाइफ लॉकच्या संशोधनानुसार, यात सहभागी बहुतांश भारतीयांनी (74 टक्के) डिजिटल स्क्रिनसमोर अधिकाधिक वेळ घालवल्याने त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे. तसंच ही बाब मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करत असल्याचं यातल्या निम्म्याहून अधिक म्हणजेच 55 टक्के नागरिकांनी सांगितलं. मित्रांसोबत ऑनलाइन वेळ घालवण्यासारख्या गोष्टींमुळे स्क्रीनसमोर जात असलेला वेळ आता मर्यादेत राखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सुमारे 76 टक्के नागरिकांनी सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Online

    पुढील बातम्या