काळजी घ्या! महाराष्ट्रातील 'या' 8 जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
काळजी घ्या! महाराष्ट्रातील 'या' 8 जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
Corona officer
Corona Update: देशात लसीकरण मोहीम वेगाने होत असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली, 30 मार्च: देशात लसीकरण मोहीम वेगाने होत असूनही कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बंगळुरू अर्बन या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
देशात गेल्या 24 तासात 56 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 271 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत.
देशात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 5.65 टक्के इतका आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 23 टक्के, पंजाबमध्ये 8.82 टक्के, छत्तीसगडमध्ये 8 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 7.82 टक्के, तामिळनाडुत 2.04 टक्के, कर्नाटकमध्ये 2.45 टक्के, गुजरातमध्ये 2.2 टक्के तर दिल्लीत 2.04 टक्के इतका रुग्णवाढीचा वेग आहे.
देशात आतापर्यंत 1 लाख 62 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 54 हजार 283, तमिळनाडूमध्ये 12 हजार 684, कर्नाटकात 12 हजार 520, दिल्लीत 11 हजार 12, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 325, उत्तर प्रदेशात 8 हजार 790, आंध्र प्रदेशमध्ये 7 हजार 210 आणि पंजाबमध्ये 6 हजार 749 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पसरण्याचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणावेळी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं या बाबी कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी आपला नंबर येईपर्यंत या सवयींमुळे आपण कोरोनाला रोखू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.