आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश

आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेलं आहे. शुक्रवारी (16 एप्रिल) देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेलं आहे. शुक्रवारी (16 एप्रिल) देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. एखाद्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले असले किंवा एखाद्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला असला, तरीही आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला नागरिकांना, तसंच मालवाहतुकीला कोणत्याही ठिकाणी बंदी घातली जाऊ नये,असं केंद्रीय गृह मंत्रालयाने पाठवलेल्या या पत्रात लिहिलं आहे.

अनेक राज्यांमधली आरोग्य यंत्रणा दुर्बळ झाली असून, आवश्यक साधनांचा तुटवडाही काही ठिकाणी भासत आहे. या पार्श्वभूमीवर देशात मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा (Medical Grade Qxygen) संपूर्ण देशभर पुरवठा करण्याचे आदेश केंद्रीय गृहसचिवांनी (Union Home Secretary) दिले आहेत. उत्तर प्रदेश, छत्तीसगडसारख्या कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या राज्यांना केंद्राने ऑक्सिजन सिलिंडर्स आणि व्हेंटिलेटर्सच्या (Ventilators) रूपाने मदत करण्याची ग्वाही दिली आहे. सात दिवसांच्या सरासरीनुसार छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आठवड्याभरात 6.2 टक्के कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

उत्तरप्रदेशात दररोज 19.25 टक्के नवे रुग्ण सापडत आहेत.  या दोन राज्यांच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ऑक्सिजन सिलिंडर्स (Oxygen Cylinders) आणि अतिरिक्त व्हेंटिलेटर्सची मागणी तातडीने पूर्ण केली जाईल, असं केंद्रीय गृहसचिवांनी सांगितलं आहे. 'दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असलेल्या 12 राज्यांतले ऑक्सिजन उत्पादक केंद्र सरकारने निश्चित केले आहेत. कोविड-19 साठीचे विशेष बेड्स वाढवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या असून एम्ससह हॉस्पिटल कॅम्पसमधल्या उपलब्ध बिल्डिंग्जचा वापरही करण्यास सांगण्यात आलं आहे,'असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रालयांच्या अखत्यारीत येणाऱ्या तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या हॉस्पिटल्सचाही वापर कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश केंद्रानेराज्यांना दिले आहेत. रायपूर आणि लखनऊमध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत आहे. त्यांनी नॅशनल हेल्थ मिशनच्या (NHM) निधीचा वापर करून निवृत्त डॉक्टर्सनाही सेवेत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच एनएसएस, बचत गटांसारख्या संस्था-संघटनांकडूनही साह्य घेण्यास सांगण्यात आलं आहे.  टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, कोरोना काळातली योग्य वर्तणूक आणि लसीकरण ही पंचसूत्री अवलंबण्यचा पुनरुच्चार केंद्र सरकारने केला आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या तीनच राज्यांत एक लाखाहून अधिक अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

हे ही वाचा-दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाच्या वाढत्या संकटात आता हेल्थ इन्शुरन्सही महागणार?

गेल्या दोन आठवड्यांत छत्तीसगडमध्ये साप्ताहिक रुग्णसंख्येत 131 टक्के वाढ झाली आहे. छत्तीसगडच्या 22 जिल्ह्यांत गेल्या 30 दिवसांतल्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि बिलासपूर हे सर्वांत जास्त प्रभावित जिल्हे आहेत. उत्तर प्रदेशात (UP) लखनऊ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराज हे सर्वांत जास्त कोरोनाबाधित जिल्हे आहेत. या दोन्ही राज्यांत आरटीपीसीआर टेस्ट्सचं प्रमाण घटून अँटिजेनटेस्ट्सचं प्रमाण वाढलं आहे. आयसोलेशन बेड्स, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर/आयसीयू बेड्स, अॅम्बुलन्स आदींमध्ये वाढ करण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. योग्य ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नियोजन आणि लवकरात लवकर रुग्णनिदान करून मृत्युदर घटवण्यासाठी प्रयत्न अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) निगेटिव्ह आलेल्यांची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट बंधनकारक करणं, ट्रेसिंग, कन्टेन्मेंट आणि सर्वेक्षण आदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.

First published: April 17, 2021, 7:24 PM IST

ताज्या बातम्या