नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : सद्यःस्थितीत कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरात लशीबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातही लशीबाबत वेगात संशोधन सुरु आहे. भारतात लवकरच लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असून लस वितरणासाठी इव्हीन (eVIN) या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
अमेरिकेनंतर भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये कोविड -19 च्या लसीकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा झाली. त्यानुसार 2021च्या सुरुवातीला देशात लसीकरणास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. या बैठकीत वारंवार इलेक्ट्रॅानिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कचा (eVIN) उल्लेख झाला. त्यामुळे या प्रणालीचा वापर करुनच लसीकरण कार्यक्रम राबवला जाणार हे आता निश्चित मानले जात आहे.
जाणून घेऊया इव्हीन (eVIN) प्रणाली विषयी
- ही एक विशेष प्रणाली आहे. स्मार्टफोनव्दारे काम करणाऱ्या या प्रणालीची निर्मिती 2015 मध्ये करण्यात आली. या प्रणालीव्दारे लसींच्या साठ्यावर देखरेख ठेवण्यात येते. लस वितरणादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शीतगृहात लस योग्य पध्दतीने ठेवली गेली आहे की नाही याचे ट्रॅकिंग ही प्रणाली करते.
- इलेक्ट्रॅानिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कचा वापर लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच या नेटवर्कमुळे लसीचा किती साठा शिल्लक आहे, याबाबत देखील माहिती मिळते.
-देशात लस वितरणासाठी राष्ट्रीय लसीकरण समूह (नॅशनल व्हॅक्सिन ग्रुप) स्थापन करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या आधारे लसीकरणाला सुरुवात करायची हे हा समूह निश्चित करणार आहे.
-सुरुवातीला मागणीच्या तुलनेत लसीचा साठा अपुरा असेल. जोखीम मूल्यमापनाच्या आधारे कोणत्या गटाला लस प्रथम देणे गरजेचे आहे, हे निश्चित केले जाईल. त्यानंतर अन्य नागरिकांचे लसीकरण केले जाईल, असे हरिणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडीयन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
-केंद्र सरकारच्या सुचनेनुसार विविध राज्यांमध्ये कोविड वॅक्सिन बेनिफिशयरी मॅनेजमेंट सिस्टीम (CVBMS) तयार होत आहे. यूएनडीपीने लसीची जास्त गरज असलेली ठिकाणे निश्चित केली आहेत. कुशल एएनएमला लसीकरणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लसीकरण कार्यक्रमात गरजेनुसार नर्सेस आणि आरोग्य क्षेत्राविषयी माहिती असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जाणार आहे.
- यासर्व तयारी दरम्यान लसीसाठी आवश्यक असलेल्या शीतगृहांच्या नियोजनाबाबत लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. कारखान्यातून सिरींजपर्यंत लसीचा प्रवास होत असताना शीतगृहांची साखळी मजबूत आणि कार्यक्षम असणे आवश्यक आहे. परंतु, देशभरात ही व्यवस्था कुचकामी आहे.
-`डब्ल्युएचओ` च्या म्हणण्यानुसार, अनेक देशांमध्ये साठवण व्यवस्था सदोष असल्याने निम्म्याहून अधिक लस खराब होण्याची शक्यता आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण तापमान नियंत्रण करण्यात येणारे अपयश होय. कोरोना हा नवा विषाणू असल्याने कोणत्याही प्रकारची निष्काळजी धोकादायक ठरू शकते. तसेच, सदोष तापमान नियंत्रण किंवा साठवणूकीतील चुकीमुळे लस खराब झाल्यास पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणावर लसनिर्मिती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-वाॅल स्ट्रीट जर्नलच्या दाव्यानुसार, औषधनिर्मिती कंपन्या लसीच्या शीतकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असून, त्याची मोठी अर्थिक किंमत विक्रेत्यांना चुकवावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine