फरीदाबाद, 11 डिसेंबर: कोरोना (COVID19) संक्रमण आणि त्याच्यापासून होणाऱ्या मृत्यूचं जगभर तांडव सुरु आहे. सध्या सर्व जगाचे डोळे कोरोना लस (COVID Vaccine) कधी येणार याकडं लागले आहेत. जगभर या विषयावर युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. कोरोना लस देशात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याची तयारी देखील आता सुरु झाली आहे.
कोरोना लस देताना त्यासाठी सिरिंज (Syringes) मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. केंद्र सरकारनं 70 दशलक्ष (Million) सिरिंजचा पुरवठा करण्याचे आदेश दोन सिरिंज कंपन्यांना दिले आहेत. आता या कंपन्यांमधून लवकरच या सर्व सिरिंज सरकारी गोदामात दाखल होतील. देशभरातून सिरिंजची मागणी मोठी आहे. भविष्यात ती आणखी वाढणार आहे. त्यामुळे ऐनवेळी सिरिंजचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ही अडचण टाळण्यासाठी हरयाणा (Haryana) मधील फरीदाबाद (Faridabad) च्या एका कारखान्यात सध्या दर तासाला एक लाख सिरिंज बनवण्यात येत आहेत.
मोठ्या प्रमाणात सिरिंज निर्मिती का?
फरीदाबादमधल्या हिंदुस्थान सिरिंज आणि मेडिकल डिव्हाईस लिमिटेड फॅक्टरीमध्ये (HMD) सध्या सिरिंज निर्मितीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा जगातील सर्वात मोठा सिरिंज निर्मितीचा कारखाना आहे. “ पुढच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात अतिरिक्त 600 दशलक्ष सिरिंजची मागणी असेल असा अंदाज आहे. सरकारने मार्च महिन्यापर्यंत 177 दशलक्ष मिलियन सिरिंजची ऑर्डर दिली आहे. देशभर कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर सिरिंजची कमतरता पडू नये यासाठी ही काळजी घेत आहोत,’’ अशी माहिती या कारखान्याचे संचालक राजीव नाथ यांनी दिली आहे.
कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर देशात पहिल्या टप्प्यात 90 कोटी तर एकूण 270 कोटी सिरिंजची आवश्यकता असणार आहे. “सरकारकडं सिरिंजचा पुरेसा साठा असून अतिरिक्त सिरिंजच्या मागणीचा अंदाज निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या निर्मितीचे काम योग्य मार्गावर आहे,’’ अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजीव भूषण यांनी दिली आहे.
हे वाचा-...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांचं 15 दिवसांचं अल्टीमेटम
एका वेळीस वापरण्यात येणाऱ्या 100 कोटी सिरिंज पुढच्या वर्षी बनवण्याचं एचएमडीचं ध्येय आहे. एचएमडीकडून यापूर्वीच युनिसेफला 10 कोटी सिरिंज देण्यात आल्या आहेत. जगभरातील शंभरपेक्षा जास्त देश ‘मेड इन इंडिया’ सिरिंजचा वापर करतात. सिरिंजच्या उत्पादनात भारत आणि चीन हे देश जगभरात आघाडीवर आहेत. भारत सरकारने सध्या तीन कंपन्यांशी सिरिंज निर्मिती करण्याचा करार केला आहे. सिरिंजची मागणी भविष्यकाळात वाढण्याची शक्यता असल्यानं सरकार आणखी कंपन्यांशी याबाबत करार करण्याची शक्यता आहे.