तेल अवीव, 25 डिसेंबर: सध्या जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वाढतच चालला आहे. असं असताना काही देशांनी लसीकरणाची (Corona vaccination) प्रक्रिया सुरू केली आहे, ही दिलासादायक बाब आहे. पण अलीकडेच कोविड -19 लसीकरण संदर्भात इस्रायलमध्ये एक अपघात झाला झाला. येथील एका फार्मासिस्टने चुकून एका डोसऐवजी कोरोना लशीचे चार डोस दिले आहेत. ही घटना समोर येताच पूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि ब्रिटन समवेत इस्रायलमध्येही लसीकरणाचं काम गेल्या आठवड्यातपासून सुरू झालं आहे.
इस्त्रायलची वेबसाइट द टाइम्स ऑफ इस्त्रायल मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, येथील एका फार्मासिस्टने कोरोना लसीचा एक डोस देण्याऐवजी एकाच वेळी चार डोस दिले आहेत. हे डोस घेतलेल्या व्यक्तीच नाव उदय अझीझी असून तो ठिक असल्याचं त्यानं चॅनल 12 ला सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरण करत असताना इंजेक्शन टोचलेल्या ठिकाणची जागा हलकीशी लाल झाली होती, असंही त्यानं यावेळी सांगितलं. या व्यतिरिक्त त्याला थोडी वेदना जाणवत असून तीन आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोसही घेणार असल्याचंही अझीझी यांनी सांगितलं.
हा अपघात कसा झाला?
एका बातमीनुसार, हे लस देण्याचं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्याला या डोसबद्दल माहित नव्हतं. खरंतर या लहान कुपीमध्ये कोरोना लशीचे चार डोस होते. फायझर लसीच्या कुपीमध्ये 4 ते 5 डोस असतात, हे त्यांना माहित नव्हतं. इस्रायलमध्ये आतापर्यंत 30 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. दुसरीकडे अमेरिका आणि ब्रिटनमधील काही लोकांनीही फायझरच्या लशीमुळे अॅलर्जी झालेल्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
इस्रायल मधील लसीकरण मोहीम
गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. या लसीकरणाचा कार्यक्रम टीव्हीवरून थेट प्रसारित करण्यात आला होता. इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, इस्त्रायलमधील कोरोना वॉरियर्संना सुरुवातील 10 रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर कोरोना लशीचा डोस दिला जाणार आहे. यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात 60 वर्षांवरील वृद्धांना ही लस देण्यात येणार आहे.