नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : बिहारमध्ये कोरोना चाचणीमध्ये (Corona Test In Bihar) मोठी हेराफेरी झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patients) वाढवून दाखवण्यासाठी खोट्या मोबाईल नंबर आणि लोकांच्या नावाचा वापर केला जात आहे. याबद्दलही माहिती मिळाली आहे, की रजिस्टरमध्ये फेरफार करून कोरोना तपासणी कीटमध्ये नफा कमवला जात आहे.
बरहट प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार -
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बरहट आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केलेल्या 26 लोकांचा मोबाईल नंबर एकच आहे. विशेष बाब म्हणजे, हा मोबाईल नंबर एका कामगाराचा असून त्यानं सांगितलं, की मी आजपर्यंत कोरोना तपासणी केलेली नाही. या आरोग्य केंद्रातील अशी एक यादी समोर आली आहे. ज्यात 26 लोकांचा मोबाईल नंबर एकच आहे. यात 11 पुरुष, 6 महिला आणि 9 मुलांचा समावेश आहे.
हा संपूर्ण प्रकार समोर येताच जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. तर, आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितलं, की त्यांना कोरोना रुग्णांच्या संख्येत करण्यात आलेल्या फेरफाराबद्दल माहिती नाही. मंगल पांडे म्हणाले, की याबद्दलची माहिती मला नाही, त्यामुळे आधी संपूर्ण प्रकरणाची माहिती करून घेतो.
तेजस्वी यादव म्हणाले, की मी आधीच बिहारमध्ये कोरोना घोटाळा होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला नकार दिला होता. बिहारमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 2 कोटी 16 लाख 64 हजार 852 लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे. तर, यातील 2 लाख 61 हजार 447 जणांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. राज्यात कोरोनानं आतापर्यंत 1 हजार 518 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Corona virus in india, Coronavirus