कोरोनात Indoor मध्ये स्वच्छतेचा अतिरेक; मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचा तज्ज्ञांचा खुलासा

कोरोनात Indoor मध्ये स्वच्छतेचा अतिरेक; मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचा तज्ज्ञांचा खुलासा

‘हवेतून होणारा प्रसार रोखण्याकडे दुर्लक्ष करून आतापर्यंत आपण सगळे पृष्ठभाग स्वच्छ करण्यात खूप वेळ, उर्जा आणि पैसा वाया घालवला आहे.’

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : हाँगकाँगचा एअरपोर्ट असो, न्यूयॉर्क सिटीतील सबवे असो वा लंडनमध्ये लॉकडाउननंतर व्यवसाय सुरू करायला सिद्ध झालेले पब्ज असोत सगळीकडे कर्मचारी डिसइन्फेक्टंट वापरून सर्व पृष्ठभाग स्वच्छ करत आहेत. कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग पृष्ठभागावरील अस्वच्छतेमुळे होऊ शकतो या धारणेमुळे ही स्वच्छता जगभर सुरू आहे.

पण शास्रज्ञांचं मत आता पक्क होत चाललंय की, या इनडोअर सार्वजनिक ठिकाणच्या पृष्ठभागांवरून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावल्याची खूपच कमी उदाहरणं त्यांना सापडली आहेत. विमानतळासारख्या गर्दीच्या इनडोअर (Indoor) ठिकाणी कोरोना रुग्णाच्या उच्छवासातून हवेत सोडला गेलेला विषाणू इतरांसाठी अतिशय धोकादायक आहे. साबण किंवा सॅनिटायझरनी 20 सेकंद हात धुणं अजूनही प्रादूर्भाव रोखण्यासाठी हिताचं आहे. पण इनडोअर ठिकाणी पृष्ठभागांची स्वच्छता करणं हे थोडं त्रासाचं होत असून त्याऐवजी अशा ठिकाणची हवा खेळती व स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला तज्ज्ञ आता देत आहेत. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट्स ऑफ हेल्थमधील श्वासोच्छवासांतून पसरणाऱ्या संसर्ग विषयातील तज्ज्ञ डॉ. केविन फेनेली म्हणाले,  ‘माझ्यामते हवेतून होणारा प्रसार रोखण्याकडे दुर्लक्ष करून आतापर्यंत आपण सगळे पृष्ठभाग स्वच्छ करण्यात खूप वेळ, उर्जा आणि पैसा वाया घालवला आहे.’

हे ही वाचा-कोरोनाचा उद्रेक झाल्याने या राज्याने पुन्हा घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय

सुरक्षिततेची खोटी भावना

हाँगकाँग शहराची लोकसंख्या 7.5 मिलियन आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचा इतिहासही आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी सॅनिटाइज्ड व्यवस्था निर्माण करण्याची केस स्टडी म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. इथल्या विमानतळ प्रशासनानी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फुल बॉडी डिसइन्फेक्शन चॅनलच तयार केलंय. ज्यातून कर्मचारी गेले की ते स्वच्छ होतात. पण यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये आपण कोरोना विषाणूपासून सुरक्षित असल्याची खोटी भावना जागृत होते इतकंच. प्रशासनही म्हणतं की आम्ही काळजी घेत आहोत. पण कोलोरॅडो बाउल्डर विद्यापीठातील एअरोसोल्स विषयातील तज्ज्ञ शेली मिलर यांच्या दृष्टिकोनातून असे बूथ उभे करून कोरोना संरक्षाणासाठी काहीच उपयोगाचं नाही. बोलणं, श्वासोच्छवास, शिंकणं, खाकरणं यातून उडणाऱ्या कणांतून विषाणूचा संसर्ग फैलावत आहे. दुसरीकडे सर्व पृष्ठभागांवर शिंपडलेल्या डिसइन्फेक्टंटमुळे तर एअरपोर्ट सारख्या ठिकाणची हवा खराब होते. मिलर म्हणाल्या, ‘एखाद्या माणसाला बाहेरून पूर्णपणे डिसइन्फेक्ट केलं की त्याला संसर्गाचा धोका कमी होईल असं एखाद्याला का वाटतं हेच मला कळत नाही.’

हायजिन थिएटर

सर्दी आणि एन्फ्लुएंझासह होणारे श्वासोच्छवासाशी संबंधित सर्व आजार दूषित पृष्ठभागांवरून पसरलेल्या जंतूमुळेच होतात. त्यामुळे जेव्हा गेल्यावर्षी मेनलँड चायनामध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाला तेव्हा प्राथमिक उपचार म्हणून पृष्ठभागांची स्वच्छता करणं हे पुढे आलं. प्लॅस्टिक व स्टीलच्या पृष्ठभागांवर विषाणू 3 दिवस जिवंत राहतो असा अभ्यास पुढे आला. पण नंतरच्या अभ्यासात लक्षात आलं की या पृष्ठभागांवर आढळलेले विषाणूंचे अवशेष हे मृत होते आणि संसर्गजन्य नव्हतेच. डब्ल्यूएचओनेही पृष्ठभागावरून होणाऱ्या संसर्गावरच जोर दिला आणि जर वैद्यकीय उपचारांदरम्यान एअरसोल निर्माण झाले असतील आणि ते हवेतून कर्मचाऱ्यांच्या श्वासोच्छवासात पोहोचले तरच संसर्ग होऊ शकतो असं हवेतून होणाऱ्या संसर्गाबाबत म्हटलं होतं. पण नव्या संशोधनातून असं लक्षात येतंय की कोंदट हवेत असलेल्या शिंकेचे शिंतोड्यांतील विषाणू अधिक तास जिवंत राहतो आणि जिथं मोकळी हवा नाही अशा गर्दीच्या ठिकाणी त्याचा प्रादूर्भाव होऊ शकतो. द लँसेट मेडिकल जर्नलमध्ये जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात असं मत मांडलं गेलं की शास्रज्ञांनी पुराव्यांचा खोलवर अभ्यास न करताच 2003 मध्ये आलेल्या सार्स महामारीतील SARS-CoV या विषाणूचा भाऊबंद असलेल्या कोरोनाबद्दल मतं मांडली.  त्यांनीच कोरोना विषाणू पृष्ठभागांवरून पसरतो ही धारणा अतिरेकी पद्धतीने पसरवली. रुटजर्स विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट आणि या शोधनिबंधाचे सहलेखक इमॅन्युअल गोल्डमन म्हणाले, ‘ मूळच्या SARS  विषाणूचं फोमाइट ट्रान्समिशन होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचे बळकट पुरावे उपलब्ध आहेत. मग त्याचा जवळचा नातेवाईक असलेला SARS-CoV-2  नोव्हेल कोरोना विषाणू खूपच विपरित वर्तन करेल असं गृहित धरणं चुकीचं आहे.’

हे ही वाचा-भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस भारताला

गोल्डमन यांचा हा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील 200 शास्रज्ञांनी डब्ल्युएचओला सांगितलं की कोरोना विषाणू संसर्ग इनडोअर वातावरणात हवेतून पसरू शकतो हे त्यांनी मान्य करावं. समाजाच्या दबावानंतर डब्ल्युएचओने रेस्टॉरंट्स, नाइट क्लब, ऑफिसं आणि प्रार्थनास्थळांमध्ये हवेतून विषाणू संसर्ग होऊ शकतो हे मान्य केलं. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रेव्हेन्शनने सुरुवातीपासून पृष्ठभागांवरून संसर्ग होऊ शकतो पण तेच प्राथमिक ठिकाण नाही असं म्हटलं होतं. तसंच शिंकेतून निघणारे शिंतोडे हेच संसर्गाचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं होतं. पण तोपर्यंत जगभर पृष्ठभाग स्वच्छ ठेवल्याने कोरोनापासून बचाव होतो हे लोकांच्या मनांवर इतकं बिंबलं होतं की हँडरेलिंगपासून ते वाणसामानापर्यंत प्रत्येक गोष्ट सगळे डिसइन्फेक्ट करत होते. याला द अलटांलिक मॅगझिनने ‘हायजिन थिएटर’ हा चपखल शब्द वापरला. द न्यूयॉर्कर मॅगझिनसाठी लिहिलेल्या लेखात जॉफ डायरनी म्हटलं होतं, ‘ स्पर्शाच्या भीतीने माझ्या टेनिस पार्टनरने सामना संपल्यावर माझ्याशी हात मिळवणं टाळलं  होतं, पण त्यानी स्पर्श केलेल्या टेनिस बॉलला मी स्पर्श केला होता मग अस्पर्शी राहण्याचा मुद्दा राहिलाच कुठं?’

याला स्पर्श नका

डब्ल्युएचओने परिसर स्वच्छतेसाठी वापरलेली रसायन घातक ठरू शकतात असं सांगितल्यानंतरही नैरोबीपासून मिलान आणि सेऊलपर्यंत सर्वत्र पृष्ठभाग स्वच्छतेचं लोण पसरलं होतं. हाँगकाँगमध्ये सार्सने 229 जणांचा मृत्यु झाला होता. त्या शहरात लिफ्टची बटणं, एक्सेलेटरची हँडल्स, सबवेमधील पृष्ठभाग हे सगळं स्वच्छ करण्यासाठी टीम कार्यरत होत्या. ते सतत स्वच्छता करत होते. त्यांनी सर्वांत कडी करत सबवे कारमधील पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी रोबोंचाही वापर केला. सरकारने सोशल डिस्टन्सिंग, सर्वत्र मास्कचा वापर असे आदेश काढले होते. हाँगकाँगमधल्या शास्रज्ञांनीही खोलवर स्वच्छतेने काहीच हानी नाही म्हणत सरकारची री ओढली होती.

स्वच्छतेच्या लोणापोटी प्रॉक्टर अँड गॅम्बलने लुटलं कमाईचं लोणी

या स्वच्छतेच्या लोणामुळे प्रॉक्टर अँड गॅम्बल या स्वच्छतेची उत्पादन तयार करणाऱ्या मल्टिनॅशनल कंपनीने महामारीच्या काळात जगभरात कमाईचं लोणी लुटलं. सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 30 टक्क्यांहून अधिक कमाई केली. ग्रेटर चायनातही त्यांनी 20 टक्क्यांहून अधिक कमाई केली.

हवेचा काय हालहवाल?

हाँगकाँग शहरात कोविड-19 चे 5400 हून अधिक रुग्ण सापडले आणि 108 जण दगावले ही संख्या शहराच्या मानाने फार मोठी नाही. सुरुवातीला काळजी घेतल्यानंतर हाँगकाँगमध्ये इनडोअर एकत्रिकरणाचे नियम शिथिल करण्यात आले. 50 जणांसह लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली. हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक येउंग किंग लून म्हणाले, ‘लोकं जेवताना किंवा ऑफिसमधील त्यांच्या क्युबिकलमध्ये गेल्यावर चेहऱ्यावरचा मास्क काढतात कारण त्यांना ती प्रायव्हेट जागा वाटते. पण तुम्ही जी हवा शरीरात घेता आहात ती प्रदूषित आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.’ त्यामुळे आतापर्यंत पृष्ठभागांची स्वच्छता करणाऱ्या जगातील सर्वांनाच हवेतील स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

 

Published by: Meenal Gangurde
First published: November 21, 2020, 11:50 AM IST

ताज्या बातम्या