हैदराबाद, 16 जुलै : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (coronavirus) लढतं आहे. प्रत्येक जण या संकटाचा सामना करत आहे, अशा संकटाच्या काळातही माणुसकीचं दर्शन सातत्याने होतं आहे. अशीच माणुसकी दाखवली ती दुबईतील रुग्णालयाने (Dubai hospital) या रुग्णालयाने एका भारतीय कोरोनाग्रस्तावर उपचार केले, त्याचं कोट्यवधींचं बिल माफ केलं. तर दुबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रुग्णाची भारतात परतण्याची सोय केली.
एकिकडे काही हॉस्पिटल पैशांशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करायला नकार देत आहेत. अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. अशात दुबईतील एका रुग्णालयाने एक आदर्श घालून दिला आहे. भारतीय कोरोना रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहता काही हजार नव्हे तर तब्बल दीड कोटी बिल रुग्णालयाने माफ केलं आहे. या रुग्णाकडून एकही पैसा घेतला नाही.
हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
तेलंगणातील (telangana) 42 वर्षांचे राजेश ओडनाला दुबईत कामाला होते. 23 एप्रिलला त्यांची तब्येत बिघडली. त्यांची कोरोना टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली. त्यांना दुबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 80 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. 80 दिवसांचं बिल 7,62,555 दिरहम म्हणजे तब्बल एक कोटी 52 लाख रुपये इतकं झालं. एवढं बिल भरणं राजेश यांना शक्य नव्हतं.
हे वाचा - पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच! आणखी समोर आले कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
राजेश यांच्यासाठी भारतीय दूतावास धावून आलं. राजेश यांना संक्रमण झाल्यानंतर त्यांना गल्फ वर्कर प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरसिंहा यांनी रुग्णालयात भरती केलं होतं. जेव्हा त्यांना राजेश यांच्या रुग्णालयाच्या बिलबाबत माहिती झाली तेव्हा त्यांनी याची माहिती दुबईतील भारतीय दूतावासातील सुमनाथ रेड्डी यांना दिली. सुमनाथ रेड्डी यांनी दुबईतील कामगार प्रकरणाचे भारतीय राजदूत हरजीत सिंह यांना याबाबत सांगितलं. हरजीत सिंह यांनी दुबईच्या रुग्णालय प्रशासनाला पत्र दिलं आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून राजेश यांचं बिल माफ करण्याची विनंती केली. रुग्णालय प्रशासनानेदेखील सकारात्मकता दर्शवत रुग्णाचं बिल माफ करून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
हे वाचा - अरे बापरे! कोरोनाग्रस्त आईपासून गर्भातील बाळाला कोरोना; डॉक्टरांनी दिला पुरावा
दरम्यान बीएपीएस स्वामिनारायण ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते अशोक कोटेचा यांनी राजेश यांची भारतात येण्यासाठी सोय करून दिली. त्यांनी राजेश आणि त्याच्या सहकाऱ्याचं भारतासाठी विमान प्रवासाचं तिकीट काढून दिलं. शिवाय खर्चासाठी दहा हजार रुपयेही दिले.
तेलंगणामधील NRI सेलचे वरिष्ठ अधिकारी ई चिट्टी बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश यांना दुबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. बुधवारी ते हैदराबादमध्ये आले. आता त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.