कोरोनानं वडील हिरावले, आई अन् भावाचीही मृत्यूशी झुंज; तरीही एका रात्रीत कर्तव्यावर परतला पुण्यातला हा डॉक्टर

कोरोनानं वडील हिरावले, आई अन् भावाचीही मृत्यूशी झुंज; तरीही एका रात्रीत कर्तव्यावर परतला पुण्यातला हा डॉक्टर

डॉ. पेणुरकर यांच्या वडिलांचा कोविड-19 मुळे (Covid 19) पुण्यात मृत्यू झाला. आयसीयूमध्ये (ICU) सातत्याने कामावर असलेल्या पेणुरकरांनी त्या संध्याकाळी स्मशानभूमीत जाऊन एकट्याने वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले.

  • Share this:

पुणे 03 मे : एखाद्या माणसाची नियती किती परीक्षा पाहते आणि तो त्या परिस्थितीशी कशी झुंज देतो याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातल्या संजीवन हॉस्पिटलमधील (Sanjeevan Hospital) इंटर्नल मेडिसीन स्पेशलिस्ट डॉक्टर मुकुंद पेणुरकर (Doctor Mukund Penurkar). गेल्या वर्षभरापासून सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना योद्धे (Corona Warrior) बनून परिस्थितीसोबत लढत आहेत. मात्र सातत्याने मानवतेची सेवा करणाऱ्या या योद्ध्यांच्या जीवनात वैयक्तिक आव्हानं आली तरीही त्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. समाजसेवेची शपथ डॉक्टरांनी व्यवसाय सुरू करताना घेतलेली असते पण ती सर्वोच्च पातळीवर पाळायची वेळ आली की भलेभले माघार घेतात. पुण्यातील कर्वे रोडजवळ असलेल्या संजीवन हॉस्पिटलमधील डॉ. पेणुरकर यांनी मात्र कर्तव्याबद्दल असलेल्या कठोरतेचा नवा परिपाठच निर्माण केला आहे.

डॉ. पेणुरकर यांच्या वडिलांचा कोविड-19 मुळे 26 एप्रिलला पुण्यात मृत्यू झाला. आयसीयूमध्ये सातत्याने कामावर असलेल्या पेणुरकरांनी त्या संध्याकाळी स्मशानभूमीत जाऊन एकट्याने वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि हा विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा संजीवन हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर रूजू झाले. त्यांची आई आणि लहान भाऊ दोघेही संजीवन हॉस्पिटलमध्येच कोविडशी झुंज देत आहेत. अशा कठीण परिस्थितीतही डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पुन्हा काम करू लागले. कर्तव्याबद्दल असलेल्या अफाट निष्ठेचा आणि निस्वार्थी भावनेचा हा परिपाठच म्हणावा लागेल. या सर्व घटनेबद्दल डॉ. मुकुंद पेणुरकर म्हणाले,‘मी डॉक्टर असूनही माझ्या वडिलांना वाचवू शकलो नाही, याचं मला प्रचंड दु:ख आहे. मात्र, मी माझं कर्तव्य पार पाडून इतर कोविड रुग्णांचा जीव वाचवला तर तीच माझ्या वडिलांना योग्य श्रद्धांजली ठरेल.’

संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉ. पेणुरकर गेल्या 10 वर्षांपासून काम करत आहेत. डॉ. पेणुरकर मूळचे नागपूरचे. पुण्यातला कोरोनाचा प्रादूर्भाव पाहून त्यांनी आई-वडिलांना लहान भावाकडे नागपूरला राहायला पाठवलं होतं पण 17 एप्रिलला त्यांच्या भावाला कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांचे आई-वडिलही कोविड पॉझिटिव्ह झाले. दुर्दैवानी तिघांचीही स्थिती गंभीर होती आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरज पडली. त्याबद्दल डॉ. पेणुरकर म्हणाले,‘नागपुरातली परिस्थिती पुण्यापेक्षा भयावह आहे. मी माझ्या डॉक्टर मित्रांच्या मदतीने नागपूरात आई-वडील व भावासाठी एकाच ठिकाणी ऑक्सिजन बेड मिळतो का हे पाहिलं. अनेक प्रयत्न करूनही तसं झालं नाही म्हणून मी त्यांना कार्डियॅक अँब्युलन्सने पुण्यात संजीवन हॉस्पिटलमध्ये आणलं. वडिलांची परिस्थिती खूपच खालावली होती. शेवटी लिव्हर निकामी झालं इतर कॉम्पिकेशन्समुळे आणि कोविडमुळे वडिलांचं निधन झालं. माझे वडील हे माझा प्रेरणास्रोत होते आणि त्यांची तब्येत प्रचंड खालावलेली असतानाही त्यांनी एकदाही मला घरी राहून त्यांची काळजी घ्यायला सांगितलं नाही.’

सध्याच्या कोविड काळात मेडिकल कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. त्याबद्दल ते म्हणाले,‘एकीकडे माझे वडील गेल्याचं दु:ख होतं दुसरीकडे आई आणि भाऊ मृत्यूशी झुंज देत होते. पण मनावर दगड ठेवून मी त्यांना वडील गेल्याची बातमी सांगितली. मी गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णांवर उपचार करतो आहे. सगळे वैद्यकीय कर्मचारी खूप ताणाखाली आहेत. अनेक प्रसंग मी पाहिले आहेत. काळाची गरज लक्षात घेऊन मी तातडीने हॉस्पिटलमध्ये रूजू झालो.’

पुण्यात पोलीस हवालदाराने केले मजुराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

डॉक्टरांनी अंत्यसंस्कार करताना त्यांची बहीण आणि काही नातेवाईकांनी त्यांच्या वडिलांचं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेतलं. त्यांची आई व भावाची तब्येत आता सुधारत आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून घरी सोडणार आहेत. डॉक्टर पेणुरकर हे पुण्याच्या फिजिशियन्स असोसिएशनचे सचिव आहेत. ते म्हणाले,‘सर्व एमडी डॉक्टर्स हे फ्रंटलाईन वॉरियर आहेत आणि ते प्रचंड कष्ट करत आहेत. समाजाला सर्वोच्च प्राधान्य आम्ही देत आहोत. कुटुंबीयांना भेटणंही अनेकांना शक्य होत नाही. हा कठीण काळ आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आणखी कष्ट करायला हवेत.’

देशातील फ्रंटलाइन वर्कसच्या कामाचं कौतुक पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी केलं होतं. लष्कराच्या विमानांनी हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टी करून त्यांना मानवंदना दिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हे योद्धे लढत आहेत त्यांना सलाम.

Published by: Kiran Pharate
First published: May 3, 2021, 2:56 PM IST

ताज्या बातम्या