...तरच भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

...तरच भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

रशियन कोरोना लशीच्या (russian corona vaccine) सुरक्षितेबाबत तज्ज्ञांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : रशियाने जगातील सर्वात पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आहे. त्यामुळे लशीची प्रतीक्षा करणाऱ्या कित्येकांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे. रशियाने आपल्याला अनेक देशांनी या लशीच्या डोससाठी ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भारतातही ही लस दिली जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रशियाने तयार केलेल्या कोरोना लशीला स्पुतनिक व्ही (Sputnik V) असं नाव दिलं आहे.  या लशीसाठी 20 पेक्षा अधिक देशांकडून अब्जावधी डोसच्या ऑर्डर आल्या आहेत. त्यात भारताचही समावेश आहे. असं रशियाने याआधी सांगितलं आहे. मात्र चाचण्या पूर्ण न झाल्याने  लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. त्यामुळे सर्व निकष गांभीर्याने तपासूनच ही लस भारतात दिली जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "रशियाने आपण कोरोना लस तयार केल्याची घोषण केली. भारतात ही लस द्यायची की नाही याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. लशीसंबंधित प्रत्येक बाबी गांभीर्याने तपासल्या जातील. त्यानंतर या लशीबाबत भारत निर्णय घेईल"

हे वाचा - COVID-19: आता फक्त 20 मिनिटांमध्ये होणार कोरोनाचं निदान, रिझल्ट 100 टक्के खात्री

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 9 लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यामध्ये रशियन लशीचा समावेश नाही.

जगाला कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मिळून Covax facility ही प्रणाली तयार केली आहे. ज्याअंतर्गत या लशींची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी नोंद झालेल्या लशींसाठी इतर देशांनाही भागीदार होण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं आहे जेणेकरून या लशींच्या उत्पादनांसाठी निधी मिळेल आणि देशांनाही लस उपलब्ध होईल.

हे वाचा - '...तर या लसीमुळे दोन वर्ष लोकं राहणार कोरोनामुक्त', रशियाचा दावा

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रुस आयलवर्ज म्हणाले, "रशियाच्या लशीबाबत काहीही निष्कर्ष देण्यासाठी आमत्याकजे पुरेशी माहिती उपलब्ध नाही आहे. लशीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि उत्पादनाबाबत जाणून घेण्यासाठी आमची रशियाची चर्चा सुरू आहे. त्यांनी चाचण्या कशा केल्या आणि त्यांचं पुढचं पाऊल काय आहे, हे आम्ही जाणून घेत आहोत"

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading