नवी दिल्ली 03 जानेवारी : जेव्हापासून 'व्हायग्रा' नावाची (Viagra medicine) गोळी बाजारात आली आहे, तेव्हापासून ती कायम चर्चेत राहिली आहे. या औषधामुळे लाखो लोकांना लैंगिक सुखाचा (Sexual pleasure) दुप्पटीनं आनंद मिळाला आहे, असा दावा या औषधाबद्दल केला जातो. तर दुसरीकडे व्हायग्राचे अनेक दुष्परिणाम (Side effect) असल्याचंही बोललं जात आहे. सध्या जगभर सर्रासपणे व्हायग्राचा वापर केला जात आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile dysfunction) या लैंगिक समस्येसाठी व्हायग्राचा वापर केला जातो. व्हायग्राची गोळी फक्त लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच नाही तर एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरवरदेखील (Cancer) परिणामकारक ठरत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी एका संशोधनात केला गेला होता.
व्हायग्रा पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळचं कारण नक्कीच सर्वात आश्चर्यचकित करणारं आहे. व्हायग्राचा वापर करून कोरोनामुळं (Corona) 45 दिवस कोमामध्ये (Coma) असलेल्या एका नर्सचा (Nurse) जीव वाचवण्यात आला. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इंग्लंडमधील गेन्सबरो लिंकनशायर (Gainsborough Lincolnshire) येथे राहणाऱ्या 37 वर्षीय मोनिका अल्मेडा (Monica Almeida) या नर्सला कोरोनाची लागण झाली होती. उपचारांदरम्यान मोनिकाची स्थिती आणखी खालावली आणि त्या कोमामध्ये गेल्या. तिची ऑक्सिजन लेव्हलदेखील कमालीची खाली गेली होती. 45 दिवस मोनिका याच अवस्थेमध्ये होती. त्यानंतर मोनिकाच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डॉक्टरांनी उपचारांमध्ये व्हायग्राचा वापर केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हायग्रामुळं मोनिका कोमातून बाहेर आली.
डॉक्टरांनी बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारासाठी हातात घेताच झाला चमत्कार
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मोनिका शुद्धीत आल्यानंतर तिनं डॉक्टर आणि आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 'जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की, मला शुद्धीत आणण्यासाठी व्हायग्राचा वापर करण्यात आला. सुरुवातीला मला चेष्टा वाटली. पण प्रत्यक्षात मला खरोखरचं व्हायग्राचा हेवी डोस देण्यात आल्याचं माझ्या लक्षात आलं. व्हायग्रामुळंच माझा जीव वाचला. त्याचा डोस दिल्यानंतर 48 तासांत माझी फुफ्फुसं (Lungs) काम करू लागली, असं मोनिका म्हणाली. मोनिकाला दमा देखील आहे, त्यामुळं तिची ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Level) फार कमी झाली होती. आता मात्र मोनिका पूर्वीपेक्षा बरी असून तिच्या घरी पुढील उपचार सुरू आहेत.
एनएचएस (NHS) लिंकनशायरमध्ये मोनिका कोरोना रूग्णांवर उपचार करत होती. या दरम्यान ऑक्टोबरमध्ये तिला कोरोना झाला होता. हळूहळू तिची प्रकृती अधिकच खालावू लागली आणि रक्ताच्या उलट्याही सुरू झाल्या. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिथून तिला लवकरच डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, घरी गेल्यानंतर मोनिकाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर ती उपचारांसाठी थेट लिंकन काउंटी हॉस्पिटलमध्ये (Lincoln County Hospital) गेली. पण, तिची ऑक्सिजन लेव्हल सतत घसरत होती म्हणून तिला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. 16 नोव्हेंबरला (2021) ती कोमात गेली होती.
व्हायग्राच्या वापरामुळं रक्ताभिसरण सुधारतं. व्हायग्रा फुफ्फुसांमध्ये फोस्पोडायस्टेरियस एंझाइम (phosphodiesterase enzyme) तयार करतं त्यामुळं रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. परिणामी फुफ्फुसांना आराम मिळतो. याच गोष्टीचा विचार करून मोनिकाच्या काही सहकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी तिच्यावर व्हायग्रा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयला यश आलं व 45 दिवसांनंतर मोनिका कोमातून बाहेर आली.
ही घटना नक्कीच आशादायी आहे. मात्र, कोरोनामुळं गंभीर स्थितीत पोहचलेल्या प्रत्येक रुग्णासाठी व्हायग्राचा वापर योग्य आहे की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळं व्हायग्रा आणि कोरोना उपचार याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient