Home /News /coronavirus-latest-news /

175 दिवसांनंतर कोरोनाबाबत महाराष्ट्रातून चांगली बातमी! दिल्लीने मात्र वाढवली अमित शाहांची चिंता

175 दिवसांनंतर कोरोनाबाबत महाराष्ट्रातून चांगली बातमी! दिल्लीने मात्र वाढवली अमित शाहांची चिंता

Coronavirus Update: दिल्लीने चिंता वाढवली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातून मात्र आनंदाची बातमी समोर येते आहे.

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: देशभरात कोरोनाला (Coronavirus) हरवण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय पाळले जात आहेत तर काही ठिकाणी अद्यापही नियमांचे उल्लंघन होत आहे. मात्र गेल्या काही दिवसात नव्या कोरोना रुग्णांचा ग्राफ काहीसा उतरता पाहायला मिळत आहे. असे असले तरीही भारताच्या राजधानीवर कोरोनाचं वाढतं सावट आहे. दिल्लीमध्ये देशातील सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात (16 नोव्हेंबर) 3800 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि तर एका दिवसात 99 मृत्यूंची नोंद झाली आहे.  दिल्ली एनसीआर शहरांत म्हणजेच गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि नोयडा याठिकाणी देखील नवे 1441 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांचा ग्राफ चढता असल्याने चिंता वाढली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कमान सांभाळली आहे. त्यांनी गृह मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन दिल्लीतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याबाबत चर्चा केली आहे. यानंतर दिल्लीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. (हे वाचा-Covid vaccine : अमेरिका, ब्रिटन आणि पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा) दिल्लीने चिंता वाढवली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातून मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद (16 नोव्हेंबर) महाराष्ट्रात झाली आहे. एका दिवसात महाष्ट्रात अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी कोरोना संक्रमणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रममे दिल्ली, पश्चिम बंगाल आणि केरळ आहे. महाराष्ट्रात गेल्या 175 दिवसातील निचांकी मृत्यूची देखील नोंद झाली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निचांकी मृत्यूची नोंद झाली. सोमवारी (16 नोव्हेंबर) 60 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3,001 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,18,380 एवढी झाली आहे. तर 2,535 नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे (Recovery Rate) 92.49 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 84 हजार 386 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (हे वाचा-मास्कबरोबर चश्मा लावणं झालंय अवघड? डॉक्टरांनी दिला फायदेशीर उपाय) इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणता येत नसले तरी काही प्रमाणात रुग्णसंख्या मात्र कमी होत आहे. गेल्या 24 तासात भारतामध्ये 30 हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै 15 पासून हा आकडा सातत्याने 30 हजारांच्या वर होता. आता तब्बल 125 दिवसांनी (16 नोव्हेंबर) 30 हजारांपेक्षा कमी अर्थात 29.1 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे ओढावलेल्या मृत्यूची संख्या 500 पेक्षा कमी आहे. देशभरात गेल्या 24 तासात 449 नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 90 टक्के आहे. 12 राज्यांमध्ये तर हे प्रमाण 95 टक्क्यांहूनही अधिक आहे. अद्यापही संपूर्ण जगभरात कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण अमेरिकेमध्ये आहे. सर्वाधिक कोरोना केसेस असणाऱ्या देशात भारताचा सहावा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांंकावर अमेरिका आहे आणि त्यानंतर अनुक्रमे फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि रशिया आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amit Shah, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Delhi

    पुढील बातम्या