Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना लशीसाठी ‘हा’ देश भारतामध्ये विमान पाठवण्यास सज्ज!

कोरोना लशीसाठी ‘हा’ देश भारतामध्ये विमान पाठवण्यास सज्ज!

देशभरात कोरोना लसीकरणाला (covid 19 vaccination) 16 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारत सरकारनं आतापर्यंत दोन लशींना मान्यता दिली आहे. भारताकडून ही लस खरेदी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत.

    नवी दिल्ली, 15 जानेवारी : देशभरात कोरोना लसीकरणाला (covid 19 vaccination) 16 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारत सरकारनं आतापर्यंत दोन लशींना मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड (Covishield) या त्या दोन लशी आहेत. सध्या सर्वच जगाचे डोळे कोरोना लशीकडं लागले आहेत. भारताकडून ही लस खरेदी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. ब्राझील (Brazil) सरकारनं तर भारतामधून ही लस आणण्यासाठी विशेष विमान तयार असल्याचं जाहीर केलं आहे. अजुल एअर लाईन्सची एअरक्राफ्ट एअरबस A330neo मुंबईमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे, असं ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या विमानातून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून 20 लाख लस थेट ब्राझीलमध्ये आणण्यात येतील असा त्यांचा दावा आहे. भारत सरकारचं उत्तर काय? “देशातील कोव्हिड 19 लशीचा उत्पादन कार्यक्रम आणि उपलब्धता याची समीक्षा करण्याचं काम सध्या सुरु आहे. दुसऱ्या देशांच्या मागणीची पूर्तता करण्याबाबतचा निर्णय घेण्यास आणखी थोडा वेळ लागू शकतो,’’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे. भारतामधून लस आणण्यासाठी ब्राझीलचं विमान सज्ज असल्याच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशांना लशीचा पुरवठा कधी केला जाणार? या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीवास्तव यांनी ‘भारत लशीचं उत्पादन आणि पुरवठ्याबाबत भारताच्या क्षमतेचा वापर या संकटाच्या प्रसंगी मानवी कल्याणपूर्तीसाठी करणार आहे,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची आठवण त्यांनी करुन दिली. “देशातील लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशांना होणाऱ्या पुरवठ्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं हे घाईचं ठरेल’’ असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतामधील कार्यक्रम काय? न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, सिरम  इंस्टिट्यूट ऑफ इंडिया(SII) सरकारला साडेचार कोटी डोस देणार आहे. एक 1 कोटी 10 लाख डोस हे पहिल्या टप्प्यात देण्यात असून असून भारत बायोटेककडून देखील लवकरच 55 लाख डोस देण्यात येणार आहेत. एकूण 1 कोटी डोसची ऑर्डर भारत बायोटेकला देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 38.5 लाख तर दुसऱ्या टप्प्यात 16.5 लाख आणि त्यानंतर आणखी 45 लाख डोस देण्यात येणार आहेत. लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाईल. या सर्वांची संख्या सुमारे 3 कोटी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या