मुंबई 28 जून: ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात HOT SPOT आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
'राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका' असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. परंतु, ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात लॉकडाउन लागू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना प्लाझमा दान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
अमेरिकेत ही कंपनी करतेय कोरोनावरच्या औषधाची अंतिम चाचणी, 4 महिन्यांत लस बाजारात
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 30 जूननंतर लॉकडाउन उठणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर नाही असे आहे. हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण धोका अजून टळलेला नाही. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे.
Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर
दुकानं उघडली म्हणून गाफील राहू नका, कोरोना आ वासून उभा आहे. तुम्ही जर घराबाहेर पडला तर कोरोनाचा धोका हा कायम आहे. काही ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, ती सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहे.
पण काळजी घेतली नाही तर संकट वाढणार आहे हे लक्षात घ्या असंही मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संपादन - अजय कौटिकवार