Home /News /coronavirus-latest-news /

 ‘करोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, 17 लाखांचा उच्चांकी टप्पा ओलांडणार

 ‘करोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, 17 लाखांचा उच्चांकी टप्पा ओलांडणार

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 18 लाख 28 हजारांवर गेली आहे. तर 95 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.58 एवढा झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत 47,246 जणांचा मृत्यू झालाय.

    मुंबई 1 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत होती. आज थोडी दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज 6 हजार 290 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 16 लाख 91 हजार 412वर गेली असून लवकरच 17 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे. Recovery Rate रेट हा 92.49वर गेला आहे. दिवसभरात 4 हजार 930 रुग्णांची नव्याने भर पडली त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 18 लाख 28 हजारांवर गेली आहे. तर 95 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.58 एवढा झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत 47,246 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, पुढच्या वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2019 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे. भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल. CNBC आवाजाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लशीची नेमकी किंमत ठरली नाही. मात्र एका डोसची किंमत 210 रुपये असेल त्यामुळे दोन डोससाठी 420 रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येनं लशीकरण करण्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च येईल.  मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला कोरोना लशीवर सरकारचे 18 हजार कोटी रुपये खर्च होऊ शकतात. किमान दोन डोस घ्यावे लागण्याची शक्यता आहे. योग्य वेळेत दोन्ही डोस देण्यासाठी कोरोना वॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क तयार करण्यात आलं आहे. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रानिक वॅक्सीन इंन्टेलिजेन्स नेटवर्कचं स्वरूप बदललं आहे. कोट्यवधी लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया खूप फायदेशीर ठरली आहे. मोदी सरकारनं सर्व राज्यांना लशींसाठी कोल्ड स्टोरेज चेन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या