नवी दिल्ली, 22 जानेवारी : भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं (बीबीआयएल-BBIL) तयार केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असून, यामुळे प्रतिकारशक्ती वाढल्याचं या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांच्या माहितीवरून स्पष्ट झाल्याचं ब्रिटीश वैद्यकीय जर्नल लॅन्सेटमध्ये(Lancent) प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलं आहे.
मृत कोरोना विषाणूच्या कणांचा वापर करून करण्यात आलेली ही लस (Vaccine) दिल्यानंतर लस टोचलेल्या ठिकाणी वेदना, डोकेदुखी, थकवा, ताप आणि मळमळ यासारखे दुष्परिणाम दिसून आले. आणखी एक प्रतिकूल परिणाम दर्शविण्यात आला आहे, मात्र तो कोव्हॅक्सिन दिलेल्या लोकांच्या गटाशी संबंधित नव्हता. 13 जुलै ते 30 जुलै या कालावधीत 827 लोकांनी या चाचण्यांमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या कारणांनी अनेक जण बाद झाल्यानंतर अखेरीस 375 लोक या चाचण्यांसाठी पात्र ठरले. या नावनोंदणी केलेल्या 375 लोकांपैकी 100चा एक याप्रमाणे तीन लस गट करण्यात आले. तर 75 जणांना नियंत्रण किंवा प्लासिबो चाचण्यांसाठी नियुक्त करण्यात आले. तीन वेगवेगळे फॉर्म्युले असलेल्या लसी या गटातील लोकांना देण्यात आल्या.
भारतातील 11 वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या. लसीचा दुसरा डोस 14 दिवसांच्या अंतरानं देण्यात आला. त्यानंतर, नोव्हेंबरच्या सुरुवातीला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची सुरुवात झाली. तेव्हा लसीची कार्यक्षमता तपासण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतरही 28 दिवस ठेवण्यात आलं. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मिळालेला प्रतिसाद स्पष्ट करण्यासाठी हे अंतर वाढवण्यात आलं. पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सुरक्षा आणि सर्वसामान्य (Local)दुष्परिणाम तपासणे हे मुख्य निकष होते. सार्स-कोव्ह-2 (एसएआरएस-सीओव्ही-2-SARS COV-2) विरुद्ध निर्माण होणारी प्राथमिक प्रतिकार क्षमताही या वेळी तपासण्यात आली. लसीचे सर्वसाधारण(Local) दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी लस दिल्यानंतर दोन तास या सहभागी लोकांवर देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत डायरी कार्डच्या सहाय्याने स्थानिक आणि सिस्टीमॅटिक (Systmatic) प्रतिक्रियांची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
हे ही वाचा-भारतीय कोरोना लशीची पाकिस्तान आतुरतेने पाहतोय वाट; काय आहे लसीकरणाची परिस्थिती?
इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना, सूज येणे असे सर्वसाधारण दुष्परिणाम तर ताप, थकवा, शरीरदुखी, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या, सर्दी, पुरळ आणि अतिसार यासारखे दुष्परिणाम तपासण्यात आले. सर्व दुष्परिणाम सहभागींनी या डायरीत नोंदविले. सर्व गटांमध्ये या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. अल्झेल-आयएमडीजी-आधारित लस घेणाऱ्या लोकांमध्ये प्रतिकार शक्ती संबधित आणि पेशी संबधीत प्रतिसाद नोंदवण्यात आले असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे. लसीकरणानंतर, लसच्या प्रत्येक डोसनंतर आयजीजी अँटीबॉडी टायटर्स किंवा विषाणूविरूद्ध प्रोटीन, रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन आणि न्यूक्लियोकॅप्सीड प्रोटीनची पातळी वाढते. लस दिलेल्या लोकांचा शरीरावरील परिणाम हा कोविड 19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या कॉन्व्हॅलेसेंट सीरममध्ये आढळलेल्या परिणामांप्रमाणेच होता. या अभ्यासात, लसी दिल्यानंतर निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा (Antibodies) प्रतिसाद किंवा दीर्घकालीन सुरक्षिततेचे निष्कर्ष याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल अपेक्षित आहे.
लसीच्या तिसर्या टप्प्यातील माहितीच्या कमतरतेमुळे या महिन्याच्या सुरूवातीला सरकारी औषध नियामकांनी कोव्हॅक्सिनला क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यातही मान्यता दिली. याचा अर्थ असा की, लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात ही लस आरोग्यसेवकांना देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर होणाऱ्या सर्व परिणामांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल. याद्वारे आपोआपच लसीची सुरक्षितता आणि प्रभाव याची चाचणी पूर्ण होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर-ICMR ) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (NIV) सहकार्याने ही लस विकसित करण्यात आली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या (BBIL) बायो-सेफ्टी लेव्हल 3 प्रकारच्या अत्याधुनिक प्रकल्पात ही संपूर्णपणे भारतीय लस विकसित आणि तयार करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.