मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसप्रमाणेच त्याबद्दल अनेक अफवाही तितक्याच वेगाने पसरत आहेत. त्यामध्ये इटलीबाबत पसरणाऱ्या अफवांचे प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियावर सध्या एका पुरुष आणि महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. मास्क गळ्यात असलेल्या या जोडप्याचे फोटो एका भावनिक कथेसह शेअर केले जात आहेत. यात ते दोघे इटलीतील डॉक्टर असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. त्यांनी मिळून कोरोनाच्या रुग्णांचा उपचार केला मात्र त्यांनाच आठव्या दिवशी कोरोनामुळे मृत्यूने गाठले असंही म्हटलं जात आहे.
व्हायरल असलेल्या पोस्टमध्ये फोटोसोबत एक कथा शेअर केली जात आहे. इटलीतील हे दोघे डॉक्टर आहेत आणि दोघेही दिवसरात्र कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा केली. मात्र 8 व्या दिवशी त्यांनाच कोरोनाची लागण झाली. वेगवेगळ्या खोल्यांत त्यांना ठेवण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना वाटलं की आपण जिवंत राहू शकणार नाही तेव्हा दोघेही हॉस्पिटलच्या लाँजमध्ये आले. तिथं आल्यानंतर दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतल्याचंही म्हटलं आहे. यानंतर दोघांचाही काही वेळातच मृत्यू झाला असंही सांगण्यात येत आहे.
दोघांच्या या फोटोबद्दल अधिक माहिती शोधत असताना इटलीतील नसून स्पेनमधील असल्याचं समोर आलं आहे. स्पेनच्या बार्सिलोना विमानतळावर हा फोटो काढण्यात आला आहे. स्पेनमध्ये कोरोना व्हायरसच्या बातम्यांसदर्भात हा फोटो अनेक माध्यमांनी वापरला आहे. हा फोटो असोसिएटेड प्रेसचा फोटोग्राफर एमिलो मेरेनट्टी यांनी काढला आहे. एमिलोंनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, गुरुवार 12 मार्च 2020 ला बार्सिलोना इथं स्पेनच्या विमानतळावर एकमेकांचा किस घेत असलेल्या जोडप्याचा हा फोटो.
A couple kiss at the Barcelona airport, Spain, Thursday, March 12, 2020. President Donald Trump announces strict rules on restricting travel from much of Europe to begin this weekend. #COVID_19 #coronavirus pic.twitter.com/wZDZEprehU
— Emilio Morenatti (@EmilioMorenatti) March 12, 2020
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना निर्बंध घातल्याची घोषणा केल्यानंतर हा फोटो टिपण्यात आल्याची माहिती एमिलो यांनी ट्विटरवर दिली होती. या जोडप्याबद्दल त्यांनाही अधिक माहिती नाही. विमानतळावर काढलेला हा फोटो आहे यापलिकडं त्यांनाही काही कल्पना नाही पण हा फोटो इटलीतील कोणत्या डॉक्टर दाम्पत्याचा नाही आणि त्याच्याशी संबंधित शेअर होत असलेली कथाही काल्पनिक आहे.
हे वाचा : कहर! लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी केला 'मुर्गा', VIDEO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus