मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'या' 10 देशांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही! काय आहे कारण?

'या' 10 देशांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही! काय आहे कारण?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोनाचा नवीन प्रकार ऑमिक्रोन (omicrom variant) जगभरात पसरत असल्याने पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दहा देश असेही आहेत, जिथं अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नाही.

    मुंबई, 20 डिसेंबर : कोरोना महामारीने जगभरात आपले हातपाय पसरुन आता दोन वर्षे झाली आहेत. या साथीने जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे प्राण तर घेतलेच; पण जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम केले. त्यामुळे मानवी जगाच्या प्रगतीवर बरेच दुष्परिणाम झाले. दरम्यानच्या काळात शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांतून कोरोनाप्रतिबंधक लशी विकसित झाल्या. त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. तोपर्यंत ओमिक्रॉन व्हॅरिएंटच्या संसर्गाची भीती उत्पन्न झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जगातले 10 देश असे आहेत, की ज्या देशांमध्ये कोरोना अद्याप पाऊल टाकू शकलेला नाही. म्हणजेच या देशांमध्ये कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही या माहितीला दुजोरा दिला आहे. यातले बहुतांश देश प्रशांत आणि अटलांटिक महासागरांमध्ये आहेत.

    हे देश समुद्रात आहेत हे या देशांमध्ये कोरोना संसर्ग न होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहेच; पण त्या देशांनी प्रवासासाठीचे कडक नियमही लागू केले होते. त्यामुळे त्यांना संसर्ग रोखण्यात यश प्राप्त झालं. काही देशांनी संसर्गग्रस्तांची माहिती लपवली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

    उत्तर कोरिया (North Korea) : या देशाने अद्याप एकही कोरोनाबाधित सापडल्याबद्दल सांगितलेलं नाही. तिथे हुकूमशहा किम जोंग उनची सत्ता आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या.

    मायक्रोनेशिया (Micronesia) : हा देश 600 हून अधिक बेटांनी बनलेला आहे. या देशाला कोरोना रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका, चीन, जपान या देशांकडून मदत मिळाली आहे.

    नियू : हा देश जगातल्या सर्वांत मोठ्या प्रवाळ बेटांपैकी एक असून, तो न्यूझीलंडपासून जवळपास 2500 किलोमीटर दूर अंतरावर आहे. न्यूझीलंडने कोविड-19विरुद्ध दिलेल्या लढ्यात नियूला (Niue) साथ दिली आहे.

    किरिबाती (Kiribati) : हा देश हवाई बेटांपासून 3200 किलोमीटर अंतरावर नैर्ऋत्येकडे आहे. तिथल्या प्रशासनाने प्रवासावर लवकर निर्बंध घातले होते. तसंच, तिथे येणाऱ्या फ्लाइट्सची संख्या फार कमी आहे. त्यामुळे त्यावर निर्बंध घालणं सोपं होतं. त्यामुळेच तिथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही.

    तुवालू (Tuvalu) : दक्षिण प्रशांत महासागरात असलेल्या या बेटस्वरूप देशाने कोरोनाला रोखण्यासाठी आपल्या सीमा बंद केल्या आणि काही परिस्थितीत क्वारंटाइन अनिवार्य केलं. तिथली लोकसंख्या 100 असून, 50 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

    नाउरू (Nauru) : आकाराच्या बाबतीत हा जगातला तिसरा सर्वांत लहान देश आहे. हा किरिबातीचा शेजारी देश असून, तिथे कोविड-19 चा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. स्थानिक प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आखले होते.

    पिटकेर्न द्वीप समूह (Pitcairn Islands) : प्रशांत महासागरातल्या चार ज्वालामुखी बेटांचा हा समूह आहे. तिथली लोकसंख्या 50 असून, त्यापैकी बहुतांश नागरिक अॅडमस्टाउन गावात राहतात.

    तोकेलाऊ (Tokelau) : हा देश दक्षिण प्रशांत महासागरात तीन उष्णकटिबंधीय प्रवाळद्वीपांनी मिळून बनला आहे. 1500 लोकसंख्येच्या या देशात एकही विमानतळ नाही. न्यूझीलंड हा याच्या जवळचा देश असून, तिथून जहाजाने या देशात जाणं शक्य आहे.

    तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) : या मध्य आशियाई देशात कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या देशाची एक सीमा उझबेकिस्तानशी, तर एक सीमा अफगाणिस्तानशी मिळते. या देशात एका बाजूला काराकुम वाळवंट असून, एका बाजूला कॅस्पियन समुद्र आहे. या देशात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही, ही बाब विश्वासार्ह नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याबद्दल शंका उपस्थित केली होती.

    सेंट हेलेना (Saint Helena) : दक्षिण अटलांटिक महासागरातलं हे एक ब्रिटिश प्रवासी क्षेत्र आहे. सेंट हेलेना हे जगातल्या सर्वांत दूरच्या क्षेत्रांपैकी एक मानलं जातं. तिथे प्रति 100 नागरिकांमागे 138 लशी उपलब्ध आहेत.

    First published:

    Tags: Corona, Corona updates, Coronavirus